धक्कादायक! राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत, देशातील १० हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:38 AM2020-09-14T08:38:38+5:302020-09-14T09:03:31+5:30
देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील पाँगाँग त्सो परिसरात चिनी सैन्य घुसखोरीचे वारंवार प्रयत्न करत असल्याने वातावरण अगदीच स्फोटक बनलले आहे. त्यातच आता चीनचेभारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस आले आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल १० हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकॉटॉकसह शेकडो चिनी अॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
झेनझुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड या कंपनीकडून ही हेरगिरी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह, भारताचे सरन्यायाधीश, सोनिया गांधी, गांधी कुटुंबीय, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, नवीन पटनाईक, कॅप्टन अमरिंदर सिंह, शिवराज सिंह चौहान, शरद पवार यांच्यासारख्ये बडे नेते. राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि अन्य केंद्रीय मंत्री, सीडीएस बीपीन रावत यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच रतन टाटा यांच्यासह अनेक उद्योगपतींचीही डिजिटल हेरगिरी करण्यात आली आहे.
चिनी कंपन्या या व्यक्तींची डिजिटल लाइफ फॉलो करत आहे. तसेच या व्यक्ती आणि त्यांचे पाठीराखे कशाप्रकारे काम करतात, यावर लक्ष ठेवले जात आहे. चिनी कंपन्या या सर्वांचा रियल टाइम डेटा एकत्रित करत आहेत. ही माहिती चीन सरकारला पुरवली जात आहे. राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिकांसोबतच खेळाडू, पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईंकांवरही लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचीही हेरगिरी केली जात आहे.
शेनजान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने चीन सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीसोबत मिळून ओव्हरसीसचा एक इन्फॉर्मेशन डाटाबेस बनवला आहे. त्याअंतर्गत ही संपूर्ण काम केले जाते, असा दावा इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या या वृत्ता करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांकडून मिळवण्यात येत असलेल्या या माहितीला चिनी कंपन्यांकडून हायब्रेड वॉर असे नाव देण्यात येते. एकीकडे एलएसीवर चिनी सैन्य भारतील लष्कराला युद्धासाठी चिथावणी देत आहे. तर दुसरीकडे चिनी कंपन्या भारताविरोधात डिजिटल युद्ध करत असल्याचे या माहितीवरून समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी