धक्कादायक...मोदींवरील डॉक्युमेंट्रीसाठी रेल्वेची बोगी जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 07:46 AM2019-03-05T07:46:17+5:302019-03-05T09:54:44+5:30
प्रतापनगर आणि विश्वामित्र या मार्गावर ब्रॉड गेज आणि नॅरो गेजवरील शुटींगसाठी चार दिवसांची परवानगी दिली होती.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनविण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीच्या शुटींगसाठी रविवारी रेल्वेची एक अख्खी बोगीच पेटविण्यात आली होती. 2002 मधील गोध्रा हत्याकांडाची दृष्ये चित्रित करण्यासाठी बोगीला आग लावण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही बोगी मॉक ड्रीलसाठी राखीव ठेवण्यात आली होती. गोध्रा हत्याकांडावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
बडोदा विभागिय रेल्वेचे प्रवक्ता खेमराज मीना यांनी सांगितले की, ही बोगी देण्यासाठी आम्ही त्याबदल्यात निर्मात्यांकडून भाडे आकारले आहे. त्यांना प्रतापनगर आणि विश्वामित्र या मार्गावर ब्रॉड गेज आणि नॅरो गेजवरील शुटींगसाठी चार दिवसांची परवानगी दिली होती. सोमवारी शुटींगचा शेवटचा दिवस होता. निर्मात्यांना सांगण्यात आले आहे की, आम्हाला ही बोगी जशी आम्ही दिली होती त्या स्थितीत परत करायची आहे.
या डॉक्युमेंट्रीसाठी मुंबईमध्येही सेट तयार करण्यात आला असून गोध्रा ट्रेन हत्याकांडासाठी प्रतापनगरमध्ये शुटींग करण्यात आले. कोच केअर सेंटरच्या जवळच हा सेट बनविण्यात आला होता, असे निर्देशक उमेश शुक्ला यांनी सांगितले.
या डॉक्युमेंट्रीमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भुमिकेत आहे.
After extensive filming at various locations of #Kutch, #Bhuj and #Ahmedabad, #PMNarendraModi begins filming in #Uttarakhand... Stars Vivek Anand Oberoi in title role... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh. pic.twitter.com/1TUbbBfUkL
— taran adarsh (@taran_adarsh) March 4, 2019
तर डॉक्युमेंटरीचे धवल पांड्या यांनी रेल्वेचा कोच जाळल्याचे वृत्त फेटाळले आहे. आम्ही रेल्वेच्या नादुरुस्त कोचचा वापर केला. चित्रिकरण केले. या कोचला आग लागल्याचे स्पेशल इफेक्टद्वारे दाखविण्यात येणार असून हा सीन 20 सेकंदांचा आहे.
गोध्रा हत्याकांडानंतर दंगल उसळली होती...
गुजरातमध्ये 27 फेब्रुवारी 2002 मध्ये साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती. यामध्ये 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर गुजरातच्या अन्य शहरांमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे 1000 हून जादा लोक मारले गेले होते.