धक्कादायक ! 50 रुपयात बलात्काराच्या व्हिडिओची विक्री
By admin | Published: August 4, 2016 12:02 PM2016-08-04T12:02:44+5:302016-08-04T12:19:34+5:30
उत्तरप्रदेशातील दुकानांमध्ये चक्क बलात्काराच्या व्हिडिओंची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. 04 - उत्तरप्रदेशातील दुकानांमध्ये चक्क बलात्काराच्या व्हिडिओंची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलीस आणि प्रशासनाच्या नाकाखाली हा सगळा कारभार चालू आहे. दररोज किमान हजार व्हिडिओ विकले जात आहेत. या व्हिडिओंची किंमत 50 ते 150 रुपयांपर्यंत लावली जात आहे. व्हिडिओ किती 'एक्सक्लूझिव्ह' आहे यावर त्याची किंमत ठरवली जाते. हे व्हिडिओ 30 सेकंद ते 5 मिनिटांपर्यंतचे आहेत.
हा सगळा काळाबाजार सध्या लपवला जात आहे. डिलरदेखील फक्त विश्वासू ग्राहकाच्या ओळखीने येणा-यांशीच संपर्क ठेवत आहेत. पण हे सगळं बेदरकारपणे आणि बेधडक केलं जात आहे.
'पॉर्न फिल्मचा काळ आता गेला आहे. ख-या आयुष्यात घडणारे गुन्हे सध्या जोर पकडत आहेत. डिलर हे व्हिडिओ तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करुन देतात, किंवा पेन ड्राइव्हमध्ये टाकून देतात', अशी माहिती आग्राच्या कसगंज मार्केटमधील एका दुकानदाराने दिली आहे. अनेकदा हे व्हिडिओ फेसबूक, ट्विटर किंवा अन्य सोशल मिडियावर अपलोड करुन विकले जातात. बलात्कार किंवा विनयभंगाच्या गुन्ह्यात सामील असणारे आरोपीच अनेकदा हे व्हिडिओ शूट करुन ऑनलाइन पोस्ट करतात.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 'बलात्कार करणारे आरोपी गुन्हा करताना फोनमध्ये याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. यानंतर या व्हिडिओचा वापर पीडित तरुणी किंवा महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी, तसंच पुन्हा तिला टार्गेट करण्यासाठी केला जातो. व्हिडिओ जाहीर करण्याची धमकी देत पोलिसांकडे न जाण्यापासूनही त्यांना रोखलं जातं', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
'आम्ही ताजगंज तसंच जवळच्या परिसरात छापा टाकून एका व्यक्तिला असे व्हिडिओ आणि पायरेटेड फिल्म्स विकताना अटक केली आहे. मात्र हे पुर्णपणे रोखणं सध्या कठीण असल्याचं', एसपी सुशील चंद्रभान यांनी सांगितलं आहे.