धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:27 PM2023-04-26T15:27:03+5:302023-04-26T15:28:28+5:30
10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली.
उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. यामध्ये उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भावना वर्मा या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण मिळवले होते. मात्र ती नापास असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रॅक्टिकलमध्ये तिला १८० ऐवजी १८ गुण मिळाल्याने ती नापास झाली. उत्तर प्रदेश बोर्डाने जाहीर केलेल्या निकालानुसार तिला ४०२ गुण मिळाले. तर पाच विषयांच्या प्रॅक्टिकलमध्ये तिला प्रत्येकी केवळ ३ गुण मिळाले, या हिशेबाने एकूण १८ गुणच मिळाले.
आता शाळेच्या प्रशासनाने सांगितले की, सदर विद्यार्थिनी ही अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. तसेच तिला शाळेने प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात ३० गुण दिले होते. मात्र बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येकी ३ गुण दिसत आहेत. या विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलमध्ये दिलेले प्रत्येकी ३ गुण जोडले तर त्याची एकूण बेरीज ही ६०० पैकी ५६२ होते. त्यानुसार या विद्यार्थिनीला एकूण ९४ टक्के गुण मिळालेले आहेत. मात्र तरीही तिच्या गुणपत्रिकेमध्ये तिला नापास जाहीर करण्यात आलं आहे.
या निकालानंतर विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाला आहे. तसेच ही विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीया मुख्यमंत्र्यांकडे तपास करून न्याय देण्याची मागणी करत आहेत. सदर भावना वर्मा ही विद्यार्थिनी अमेठीमधील शिवप्रताप शिवप्रताप इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेते.