धक्कादायक सर्व्हे: बिहारमधील सत्तांतराचा फटका, आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:22 PM2022-08-11T22:22:33+5:302022-08-11T22:23:18+5:30
Survey:
नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत आरजेडीसोबत महाआघाडी करून बिहारमध्ये भाजपाला धक्का दिला आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका भाजपाला राष्ट्रीय पातळीवर बसण्याची शक्यता आहे. आज तक आणि सी-व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
या सर्वेनुसार १ ऑगस्टपर्यंत लोकसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ५४३ पैकी एनडीएला ३०७ जागा मिळाल्या असत्या. तर यूपीएला १२५ जागा मिळाल्या असत्या. तर इतरांच्या खात्यात १११ जागा गेल्या असत्या. मात्र आज निवडणूक झाली तर एनडीएला २८६ जागांवर समाधान मानावे लागेल. म्हणजेच बिहारमधील बदलत्या समिकरणांमुळे भाजपाला २१ जागांचे नुकसान होणार आहे. तर यूपीएला १४६ जागा मिळतील.
दरम्यान, आज निवडणूक झाल्यास एनडीएला ४१.४ टक्के मते मिळतील. तर यूपीएला २८.१ टक्के आणि इतरांना ३०.६ टक्के मते मिळतील. यावेळीही यूपीएला १३.३ टक्के मते मिळतील. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव आघाडीवर असून, त्यांना ५३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान म्हणून ६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
सर्वेमध्ये २८.१ टक्के लोकांनी एनडीएच्या सरकारचं कामकाज खूप चांगलं असल्याचं सांगितलं. तर २८ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज चांगलं असल्याचं सांगितलं. २३.७ टक्के लोकांनी एनडीए सरकारचं कामकाज खूपच खराब असल्याचं सांगितलं. तर ८.५ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज खराब असल्याचं सांगितलं.