धक्कादायक! तरूणाशी बोलताना पाहिलं, वडिलांनी गळाच कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 11:02 AM2018-03-11T11:02:47+5:302018-03-11T11:04:56+5:30
शुक्रवारी सकाळी वडिलांनीच मुलीचा मृतदेह ट्रॉनिका सिटी येथून शोधून काढला.
दिल्ली : राजधानी दिल्लीच्या करावल नगर परिसरात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिच्याच वडिलांना अटक केली आहे. वडिलांनी मुलीला एका तरूणासोबत बोलताना पाहिलं, त्या रागातून त्यांनी तिचा गळा कापून खून केला.
येथील डीसीपी ए. के. सिंघला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश(40) यांचा करावल नगर परिसरात दूध डेअरीचा व्यवसाय आहे. 7 मार्च रोजी त्यांची मुलगी खाण्यासाठी मोमोज घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. नेहमी छोट्या भावासोबत बाहेर जाणारी मुलगी आज एकटी गेल्याने वडिलांना संशय आला. संशय आल्यामुळे त्यांनी मुलीचा पाठलाग केला, तर घरापासून थोड्या अंतरावर ती एका तरूणाशी बोलताना दिसली. सुदेश यांना पाहून त्या मुलाने तेथून पळ काढला. पण संतापलेल्या सुदेश यांनी मुलीला गाडीवर बसवून ट्रॉनिका सिटी येथे नेले आणि त्या ठिकाणी चाकून तिचा गळा कापून खून केला. मृतदेह तेथेच खड्ड्यात फेकून आरोपी सुदेश घरी परतला.
त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली. पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही तपासले पण काही हाती लागलं नाही. अखेर शुक्रवारी सकाळी वडिलांनीच मुलीचा मृतदेह ट्रॉनिका सिटी येथून शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी आणखी कसून तपास केला आणि सीसीटीव्हीमध्ये मुलगी एका गाडीवर जाताना दिसली. ती गाडी आणि हेल्मेट मुलीच्या वडिलांच्या गाडीप्रमाणेच दिसत होते. संशय आल्यामुळे पोलिसांनी वडिलांकडे कसून चौकशी केली आणि त्याने घडलेली घटना कथन केली.
त्या मुलाचा खून करायचा होता -
अनेकदा मुलीला त्या तरूणाशी बोलू नकोस असं समजावलं होतं, मला त्याच्याशी तिचं बोलणं आवडत नव्हतं. त्यादिवशी ती पुन्हा त्याच तरूणाला भेटायला गेल्याचा मला संशय आला त्यामुळे रागात मी चाकू घेऊन गाडीवर घराबाहेर पडलो. मला त्या मुलाचा खून करायचा होता , पण मुलगा पळून गेला. (फोटो क्रेडिट - द हिंदू)