धक्कादायक! हायटेक चोरट्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, बंगळुरूत 'कारचोरी'चा क्रॅशकोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:13 PM2019-08-20T14:13:09+5:302019-08-20T14:15:36+5:30
दिल्ली-एनसीआर येथून अटक करण्यात आलेल्या चोरांकडे कुठलिही मास्टर की सापडली नाही.
नवी दिल्ली - दिल्ली एनसीआर येथील कारचोर हायटेक बनले आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण या कारचोरांनी स्पेशल ट्रेनिंग घेतले असून बंगळुरू येथे क्रॅशकोर्स केला आहे. त्यामुळेच, कारचोरी करताना आपल्यासमवेत ते लॅपटॉप बाळगत असल्याचं या चोरट्यांनी पोलिसांच्या तपासणीत कबुल केलं आहे. आपल्याजवळील लॅपटॉपच्या सहाय्यानेच ते कारचा दरवाजा उघडतात. कारचा दरवाज्याला चावी न लावता, कारचे सिक्युरिटी सिस्टीमच हॅक करण्याचं तंत्रज्ञान ते शिकले आहेत.
दिल्ली-एनसीआर येथून अटक करण्यात आलेल्या चोरांकडे कुठलिही मास्टर की सापडली नाही. केवळ 2 ते 4 टक्केच चोर असे आहेत, ज्यांच्याकडे मास्टर की आहे. सद्यस्थितीत 10 लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या गाडींमध्ये दरवाजा आणि इंजिन हे एका सॉफ्टवेअरच्या मदतीने लॉक आणि अन लॉक करण्यात येत असल्याचे एका ऑटो एक्सपर्टने म्हटले आहे. त्यामुळे चावीशिवायही गाडीचा दरवाजा उघडला जाऊ शकतो.
दिल्ली-एनसीआर येथे गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई करत अनेकांना जेरबंद केले आहे. त्यावेळी, चोरट्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. महागड्या कारमध्ये कॉम्प्युटरवाली ऑटो लॉक सिस्टीम बनविण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर सिस्टीम उघडण्याचं ट्रेनिंग काही चोरट्यांनी बंगळुरू येथे जाऊन घेतलं आहे. त्यासाठी, 25 हजार रुपयांची फी आकारण्यात येत आहे. तसेच, या चोरट्यांना 35 ते 40 हजार रुपये किंमतीचे एक डिव्हाईसही देण्यात येतं.