धक्कादायक ! वृत्तपत्रात जाहिरात देऊन दिला ट्रिपल तलाक
By admin | Published: April 6, 2017 09:09 AM2017-04-06T09:09:38+5:302017-04-06T09:09:38+5:30
एका अनिवासी भारतीयाने वर्तमानपत्रात जाहिरात देत आपल्या पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 6 - एका अनिवासी भारतीयाने वर्तमानपत्रात जाहिरात देत आपल्या पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तलाक देणा-या या एनआरआयविरोधात फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे देशभरातून ट्रिपल तलाक रद्द व्हावा यासाठी आवाज उठवला जात असताना अशा घटना समोर येत आहेत.
आरोपी मोहम्मद मुश्ताकुद्दीन याने जुलै 2015 रोजी 25 वर्षीय तरुणीशी लग्न केलं होतं. यानंतर तो तिला आपल्यासोबत सौदी अरबला घेऊन गेला होता. गेल्याच महिन्यात आपल्या 10 महिन्याच्या बाळासहित हे दांपत्य भारतात आलं होतं. यावेळी आपली पत्नी आणि बाळाला सोडून मोहम्मद मुश्ताकुद्दीन पुन्हा सौदी अरबला निघून गेला. मोहम्मद मुश्ताकुद्दीनने एका स्थानिक उर्दू वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपल्याला तलाक दिला असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे.
याआधी मोहम्मद मुश्ताकुद्दीनने पत्नीसमोर 20 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यामुळे तिचा छळ केला जात होता. मोहम्मद मुश्ताकुद्दीन सौदी अरबला निघून गेल्यानंतर सासरच्यांनीही महिलेला घरातून हाकललं आहे.
कुराणानुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असं मानलं जातं. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र भारतात अद्यापही या प्रथेचं पालन केलं जातं.
सामाजिक सुधारणांच्या नावाखाली वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. हा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने न्यायालय त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असे सांगून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीन तलाक (या शब्दाचा तीनदा उच्चार करून घटस्फोट देणे) प्रथेचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले होते. मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात या प्रथेला आव्हान दिले. ही प्रथा घटनाविरोधी असल्याचा तिचा दावा आहे.
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
‘वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे,’ असे मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.