धक्कादायक! महिला आंदोलकांवर उत्तर प्रदेश पोलिसांचा लाठीचार्ज; Video वायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:30 PM2022-11-07T13:30:47+5:302022-11-07T13:31:23+5:30
आंदोलक महिलांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
आंबेडकरनगर: उत्तर प्रदेशपोलिसांचा महिलांवर अमानुषपणे लाठीमार आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून यूपी पोलिसांनी दबंगगिरी स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, महिलांनी त्यांच्यावर आणि वाहनांवर दगडफेक सुरू केल्यानंतरच किरकोळ बळाचा वापर केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
यामुळे सुरू होते आंदोलन
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आंबेडकर नगर जिल्ह्यातील जलालपूरचा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ महिला आंदोलन करत होत्या. रविवारी पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिलांचा एक गट आंदोलन करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान काही आंदोलकांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह पोलिसांवर दगडफेक सुरू केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही महिला महिला पोलिसांवर हल्ला करताना आणि त्यांचे केस ओढताना दिसत आहेत.
अम्बेडकरनगर: प्रदर्शन कर रही महिलाओं पर पुलिस ने किया लाठीचार्ज.
— Saurabh Yadav (@Saurabh21Ydv) November 7, 2022
मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक स्थानीय लोगों ने डॉ. अंबेडकर की प्रतिमा के पास नींव खोदने को लेकर विरोध किया था. @wpl1090#Ambedkarnagar@Uppolice@CMOfficeUPpic.twitter.com/p4BJl7Ne00
बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना
हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील जलालपूर कोतवाली भागातील वाजिदपूर परिसरातील आहे. शनिवारी काही अराजक तत्वांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. याबाबत संतप्त लोकांनी तीव्र निदर्शने केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी निदर्शनात सहभागी महिलांनी महिला पोलिसांना मारहाण केली.
आंदोलकांवर लाठीचार्ज
यानंतर सहकारी महिला पोलिसांना वाचवण्यासाठी उर्वरित पुरुष पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. आंबेडकर नगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनावरही हल्ला केला आणि तोडफोड केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे ते म्हणाले.