मास्टर माइंड साईबाबासह पाच आरोपींना धक्का, निर्दोष सोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठरवला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:34 AM2023-04-20T07:34:02+5:302023-04-20T07:34:30+5:30
Court: दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. तसेच, हे प्रकरण कायद्यानुसार व गुणवत्ता विचारात घेऊन नव्याने निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय एम. आर. शाह व सी. टी. रवी कुमार यांनी केवळ प्रकरणातील पक्षकारांची सहमती लक्षात घेता निर्णय दिला. प्रकरणाची गुणवत्ता विचारात घेतली नसल्याने सुनावणीदरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणांनी उच्च न्यायालयाने प्रभावित होऊ नये, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश दिला होता. प्रकरणावर नवीन न्यायपीठामध्ये कार्यवाही पूर्ण करून चार महिन्यांत निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.