धक्कादायक, क्वॉरंटाइन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने चिमुरडीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:12 PM2020-05-26T13:12:00+5:302020-05-26T13:12:25+5:30
मुलगी शाळेच्या एका खोलीत झोपली होती.त्याचवेळी तिच्याजवळ एक भला मोठा साप बसला होता.
अनेक ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊनच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये राहावे लागत आहे. १४ दिवस अशा ठिकाणी काढणे म्हणजे एक मोठ्या संकटावर मात केली, अशी भावना निर्माण होते. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. योग्य ती स्वच्छता न केल्यामुळे मच्छर आणि सरपटणा-या प्राण्यांचाही तिथे धोका निर्माण होतो. अनेकांचे कोरोनापासून नाही तरी इतर गोष्टींमुळेच मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. बेतालघाट जिल्ह्यातील 4 वर्षीय अंजना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिल्लीहून आई-वडिलांसह सुखरुप गावी पोहोचली होती. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सध्या शहरांतून प्रत्येकालाच कोरोनाची चाचणी करावी लागते त्यानंतर गावात प्रवेश करण्याआधी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस राहावे लागत आहे. १४ दिवस पूर्ण केल्यानंतरच गावात प्रवेश देण्यात येत आहे. दिल्लीहून आई-वडिलांसह आलेली ४ वर्षाची चिमुरडीलाही गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र ही क्वॉरंटाईन सेंटरच मुलीचा घात करेल याचा विचारही कधी कोणी केला नसेल.
मुलगी शाळेच्या एका खोलीत झोपली होती. त्याचवेळी तिच्याजवळ एक भला मोठा साप बसला होता. त्यावेळी मुलगी एकटीच झोपली होती. आई- वडील बाहेर बसले होते. मुलगी काय करते हे पाहण्यासाठी वडील खोलीत आले.
तेव्हा खोलीत सापाला बघून त्यांच्याही पायाखालची जमीन घसरली. त्यांनी कसंबसं सापापासून मुलीची सुटका केली. यानंतर मुलीच्या शरीरावर सापाने दंश केल्याच्या निशाण त्यांनी पाहिले. लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. या चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न मात्र कायम आहे.