अजबच! 7 वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन चोरीला गेलेले बूट; पोलिसांचा आता आला फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:31 PM2023-09-16T17:31:06+5:302023-09-16T17:38:32+5:30
एका व्यक्तीचे सात वर्षांपूर्वी प्रसिद्ध सावरिया सेठ मंदिरातून बूट चोरीला गेले होते.
राजस्थानच्या चित्तौडगडमधील एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीचे सात वर्षांपूर्वी प्रसिद्ध सावरिया सेठ मंदिरातून बूट चोरीला गेले होते. शिवपुरी येथील रहिवासी महेंद्रकुमार दुबे यांनी या घटनेबाबत मंडाफिया पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या संदर्भात पोलिसांना नुकतेच काही बूट सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी व्यक्तीला बूट ओळखण्यासाठी बोलावलं. मात्र, प्रवासाचा खर्च जास्त असल्याने महेंद्र दुबे यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला.
4 जानेवारी 2017 रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी महेंद्र कुमार दुबे दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेतल्यानंतर त्यांचे बूट चोरीला गेले. महेंद्र कुमार दुबे हे विक्षिप्त स्वभावाचे व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले. बूट चोरीला गेल्यानंतर संतप्त झालेल्या त्यांनी मंडाफिया पोलीस चौकीत याप्रकरणी लेखी तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी काही बूट जप्त केले.
अलीकडेच महेंद्रकुमार दुबे यांना फोनवरून माहिती मिळाली की, मंदिर परिसरातून चोरीचे बूट सापडले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात येऊन तुमचे बूट ओळखा. यावर व्यक्तीने पोलिसांना फोटो पाठवण्यास सांगितला, जेणेकरून ते फोटोवरून ओळखू शकतील, परंतु पोलिसांनी नकार देत बूट ओळखण्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर तुमचे जबाब नोंदवले जातील. तरच बूट मिळतील.
एका न्यायाधीशाचा मुलगा मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यानंतर न्यायाधीशांच्या मुलाचे बूटही मंदिरातून चोरीला गेले. याबाबत न्यायाधीशांच्या मुलाने बूट चोरीला गेल्याची तक्रार केली. या घटनेने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. हे प्रकरण खूप चर्चेत राहिले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही बूट जप्त केले. या प्रकरणाचे वृत्त समजल्यानंतर महेंद्रकुमार दुबे यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या तक्रारीचा हवाला देत कारवाईबाबत विचारणा केली. त्यावर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात येऊन बूट ओळखण्यास सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.