CoronaVirus: कोरोनाची लागण झालेल्या ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन; मेरठमध्ये सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:22 PM2021-04-30T17:22:44+5:302021-04-30T17:24:04+5:30
CoronaVirus: कोरोनाचे संकट आल्यानंतर देशाला अनेक धक्के बसत आहेत.
मेरठ: भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठाच तडाखा बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवे उच्चांक गाठत असताना, कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. कोरोनाचे संकट आल्यानंतर देशाला अनेक धक्के बसत आहेत. ‘शूटर दादी’ नावाने सुप्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर चंद्रो तोमर यांच्यावर मेरठमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (shooter dadi chandro tomar passes away due to corona in meerut hospital)
२६ एप्रिल रोजी चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले होते. त्यांना बागपतच्या आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारासाठी गुरुवारी त्यांना मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर चंद्रो तोमर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली होती.
“आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र
जगातील सर्वात वयोवृद्ध नेमबाज
चंद्रो तोमर यांचा जन्म मुजफ्फरनगरमध्ये झाला होता. त्यांनी नेमबाजीला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय ६० वर्ष होते. जगातील सर्वांत वयोवृद्ध नेमबाज म्हणून त्यांना ओळखले जाते. चंद्रो तोमर यांनी अनेक स्पर्धांत भाग घेत आपल्या कौशल्याची दखल घेण्यासाठी अनेकांना भाग पाडले. चंद्रो तोमर यांच्या आयुष्यावर आधारीत 'सांड की आँख' नावाच्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चंद्रो तोमर यांना तत्कालीन राष्ट्रपतींकडून 'स्त्री शक्ती सन्मान'ही प्रदान करण्यात आला होता. अभिनेता आमिर खान याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातही चंद्रो तोमर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन; कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका
दरम्यान, प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले. झी न्यूजमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते. झी न्यूजमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या सुधीर चौधरींनी सरदाना यांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली. वृत्तवाहिन्यांमधला प्रसिद्ध चेहरा असलेले रोहित सरदाना आज तक वृत्तवाहिनीच्या 'दंगल' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे. २०१८ मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.