नोटांचा तुटवडा, जनता संतप्त!

By admin | Published: November 12, 2016 04:41 AM2016-11-12T04:41:33+5:302016-11-12T04:41:33+5:30

जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणार, ही सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी ठरली असून, शुक्रवारी अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या पुरेशा नोटाच न आल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Shortage of notes, people angry! | नोटांचा तुटवडा, जनता संतप्त!

नोटांचा तुटवडा, जनता संतप्त!

Next

पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसताना, घाईघाईने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्दच का केल्या?
नवी दिल्ली : जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणार, ही सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी ठरली असून, शुक्रवारी अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या पुरेशा नोटाच न आल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. काही ठिकाणी केवळ दोन हजार रुपयांच्या नोटाच बँकांकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे ग्राहकांना नवे चलन मिळाले. पण आता एवढी मोठी नोट कुठे सुटी करायची, हा प्रश्न कायम राहिला. त्यातच अनेक एटीएममध्ये १00 च्या नोटाच नव्हत्या आणि काही मशिन्स बंद होत्या. त्यामुळे देशभरात नोटांचा तुटवडा झाला आणि लोकांच्या संतापाला पारावार उरला नाही. आता एटीएम मशिनमध्ये २ हजारची नोट बसत नसल्याने हा घोळ आणखी काही दिवस चालणार आहे.
चार-चार रांगेत उभे राहायला लावणारे हे सरकार आम्हाला काही कामधंदा नाही, असे समजते आहे की काय? सरकारला आमच्या त्रासाची, हालांची अजिबात जाणीव नाही. आम्ही आमच्याच हक्काच्या दोन आणि चार हजार रुपयांसाठी रांगेत उभे आहोत, पण बँकेतून, एटीएममधून ही रक्कम मिळेलच, याची खात्री नाही. पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसताना, घाईघाईने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्दच का केल्या? काळा पैसावाले खुशाल फिरत आहेत. त्यांना काही रांगेत उभे राहावे लागत नाही. आम्ही मेहनत, मजुरी करून ही रक्कम मिळवली आहे. पण तीही सहजासहजी आमच्या हाती द्यायला सरकार तयार नाही, अशा शब्दांत स्त्रिया, पुरुष, वृद्ध आपला संताप व्यक्त करताना दिसत होते.
शुक्रवारी सकाळपासूनच लोकांच्या बँका आणि एटीएमसमोर रांगा लागल्या होत्या. परंतु अनेक एटीएम मशीन्स काम करीत नव्हती त्यामुळे लोकांची खूपच गैरसोय झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बँका आणि एटीएम परिसरात तत्काळ सुरक्षा वाढविली. अनेक एटीएममध्ये पैसेच नसल्याचे कळताच लोकांनी संताप व्यक्त केला. 
विमला देवी (६४) म्हणाल्या की, मी पहाटे चार वाजता उठून एटीएमवर आले तर तेथे आधीच मोठी गर्दी होती व तेथे रोख रक्कम नसल्याची तक्रार लोक करीत होते. हीच तक्रार अनेकांनी केली. कित्येक सहकारी बँकांमध्ये रक्कमच दुपारनंतर पोहोचली. तिथे जाणाऱ्या ग्राहकांना हात हलवत परतावे लागत होते. आम्ही मात्र काही कारण नसताना लोकांच्या शिव्या ऐकतो आहोत, असे अनेक बँक अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.

पैशांसाठी आम्हालाच मरायची पाळी आली
नोटांसाठीच्या रांगेत मुंबईच्या मुलुंड भागात एका ज्येष्ठ नागरिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमध्येही ७५ वर्षांचा एक वृद्ध बँकेच्या रांगेत उभा असताना मरण पावला. या बातम्या पसरताच लोक अधिकच चिडले. आमच्या पैशांसाठी आम्हालाच मरायची पाळी आली आहे, अशा प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केल्या. मोदी सरकार आणखी किती लोकांना बँकेपुढील रांगेत मारू इच्छित आहे, असा सवाल एका महिलेने केला.

निराशा, निराशा अन् निराशाच
बँकांच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये रोख रकमेचा भरणाच झाला नसल्याचे त्यांना सांगितले. बँकांमध्येही १00 च्या नोटा आल्याच नाहीत. केवळ दोन हजार रुपयांच्या नोटाच पाठविण्यात आल्या. प्रत्यक्षात खर्चासाठी सुटी रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांना निराश व्हावे लागले. काही बँकांनी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने काउंटर लवकर बंद केले, तर काही बँकांनी चार हजारांऐवजी दोन हजारच बदलून दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ, संताप व हतबलतेची भावना निर्माण झाली आहे.


आयकर छाप्यांमुळे सराफा दुकाने बंद!
गुरुवारी रात्री आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे मारल्यामुळे राजधानी व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे. दिल्लीसह देशभरातील काही सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.

Web Title: Shortage of notes, people angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.