ज्याच्यावर प्रेम केलं त्याला भेटण्याचं स्वातंत्र्य पाहिजे - हादिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 01:11 PM2017-11-29T13:11:47+5:302017-11-29T13:13:53+5:30
बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणानंतर चर्चेत आलेली केरळमधील तरुणी हादियाने आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हादियाची नातेवाईकांच्या तावडीतून सुटका झाली असून, सध्या ती तामिळनाडूत पुढचं शिक्षण घेत आहे.
चेन्नई - बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणानंतर चर्चेत आलेली केरळमधील तरुणी हादियाने आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हादियाची नातेवाईकांच्या तावडीतून सुटका झाली असून, सध्या ती तामिळनाडूत पुढचं शिक्षण घेत आहे. कथित लव्ह जिहादचा बळी ठरलेल्या हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र आपल्याला आपला पती शफीनला भेटण्याचं स्वातंत्र्य नसल्याचं हादिया बोलली आहे.
धर्मांतर केलेल्या हादियाने सांगितलं आहे की, 'मला त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे, ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करते. कॉलेज माझ्यासाठी दुसरं कारागृह तर ठरणार नाही ना.. यासाठी मी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. मी माझ्या मर्जीने इस्लाम धर्म स्विकारला आहे. मी माझा अधिकार मागत आहे, जो प्रत्येक नागरिकाकडे आहे. याचा राजकारण आणि जाती-धर्माशी काही संबंध नाही'.
I asked for freedom from court. I wanted to meet my husband but the fact is that I’m not free till now and that’s the truth: Hadiya pic.twitter.com/hdYXdAFkAn
— ANI (@ANI) November 29, 2017
'कॉलेजला पुन्हा जायला मिळाल्याने मी आनंदी आहे. मी न्यायालयाकडे स्वातंत्र्य मागितलं. मला माझ्या पतीला भेटायचं आहे, पण सत्य हेच आहे की मी अद्याप स्वतंत्र नाही', असं हादियाने म्हटलं आहे.
अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या आदेश दिला. तिच्या वडिलांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ‘आमच्या कुटुंबात कोणाही दहशतवाद्याला स्थान नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.