मी पद्म पुरस्कार परत करावा का? प्रकाश आमटे यांचा सवाल; हेमलकसातील प्राणी ‘अनाथ’ होण्याची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:55 AM2017-11-04T05:55:06+5:302017-11-04T05:55:06+5:30
डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.
- विकास झाडे
नवी दिल्ली : डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.
डॉ. प्रकाश आमटे व पत्नी डॉ. मंदाकिनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा-भामरागड भागात आदिवासींची सेवा करतात. त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे येथील लोकांच्या अंगावर कपडे आले, आरोग्य जागृती निर्माण झाली.
डॉ. आमटे दाम्पत्याने प्राण्यांचेही पितृत्व स्वीकारले. जखमी प्राण्यांचे अनाथालय उभारले. शंभरावर प्राणी येथे आहेत. परंतु प्राण्यांचे अनाथालय कसे असू शकते, असा प्रश्न वन अधिकाºयांना पडला व प्राण्यांचा सांभाळ बेकायदेशीर असल्याचे कळवले. अनाथालय बंद करा, प्राण्यांना जंगलात सोडा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा दम भरण्यात आला. वन्यजीव समितीपुढे ते आपले म्हणणे मांडणार आहेत.
...तर प्राणी मरतील : उपचारासाठी, शिकारीतील मरण टाळण्यासाठी आणलेले प्राणी येथे वाढले. त्यांना शिकार कशी करायची, हे माहीत नाही. जंगलात वावरण्याची सवय नाही. ते १५ ते २० वर्षांचे आहेत. अनाथालय बंद केल्यास प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? आठवडाभरातच ते मरतील. मला ज्या कार्यासाठी सरकारने पद्म पुरस्कार दिला, त्याविरोधात धोरण आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार परत करायची भूमिका घ्यावी लागेल. - डॉ. प्रकाश आमटे
आमटे कुटुंब देशाचे
वैभव आहे. डॉ. प्रकाश आमटे पत्नीसह जंगलात राहिले. त्यांनी प्राण्यांवर प्रेम केले. प्राण्यांसाठीचे नियम कठोर असले तरी परिस्थितीचा विचार व्हायला हवा. -हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री