पुरुषांनी तिकिटाचे पैसे द्यायचे आणि महिला मोफत प्रवास करणार? प्रवाशाची पोस्ट होतेय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:57 IST2025-01-09T18:56:50+5:302025-01-09T18:57:55+5:30
Karnataka Bus Service News: कर्नाटकमध्ये महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेबाबत बंगळुरूमधील एका प्रवाशाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुरुषांनी तिकिटाचे पैसे द्यायचे आणि महिला मोफत प्रवास करणार? प्रवाशाची पोस्ट होतेय व्हायरल
मागच्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक राज्यांत महिलांना काही दिवसांपासून ते नियमित मोफत बस प्रवासासारख्या सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. याचा लाभ लाखो महिलांना होत आहे. तर निवडणुकांमध्ये राजकीय लाभ सत्ताधाऱ्यांना होतो. दरम्यान, महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेबाबत बंगळुरूमधील एका प्रवाशाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पोस्टबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच सोशल मीडियावर आतापर्यंत ही पोस्ट १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. तसेच हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
किरण कुमार असं ही पोस्ट लिहिणाऱ्या प्रवाशाचं नाव आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात की, मी बंगळुरू येथून म्हैसूरसाठी सकाळी बस पकडली. तिचं तिकीट २१० रुपये एवढं होतं. केएसआरटीसीची आरामदायक बस आणि जलद प्रवासासाठी जागतिक दर्जाचा महामार्ग, अशा सर्व सुविधा होत्या. मात्र मी काही गोष्टी सांगू इच्छितो, असं सांगत त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
- बसमधील ५० प्रवाशांमध्ये सुमारे ३० महिला होत्या. त्यांना केवळ आधारकार्ड दाखवायचं होतं. बाकी प्रवास मोफत होता. हे योग्य आहे का? हीच समानता आहे का?
- उर्वरित २० प्रवासी प्रवासाचं संपूर्ण तिकीट देत आहेत, हे योग्य आहे का?
-मी एका वृद्ध प्रवाशाला तिकीट देण्यासाठी खिसे चाचपताना पाहिले. तर त्यांच्या शेजारची तरुण महिला व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हे योग्य आहे का?
-जर राज्याकडे एवढं अतिरिक्त उत्पन्न असेल तर या २० प्रवाशांचाही प्रवास मोफत केला जात नाही.
- जगभरात सब्सिडी आणि कल्याणकारी सेवा ह्या ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा लोकांना मिळतात. येथे बंगळुरू आणि म्हैसूर यांसारख्या श्रीमंत शहरांमधील महिला आहेत. मोफत बस प्रवास असल्याने त्या मोफत प्रवास करत आहेत, हे योग्य आहे का?
- मोफत प्रवासासाठी खर्च होणाऱ्या या रकमेचा वापर सफाई, शहरांमधील खड्डे बुजवण्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करता येणार नाही का? या रकमेचा अशाच प्रकारे आणखी काही उपयोग करता येईल.
I took an early morning bus to Mysuru, from Bengaluru. ₹210 fare. Comfortable KSRTC bus and a world class highway for fast travel.
— Kiran Kumar S (@KiranKS) January 8, 2025
But I got a few thoughts.
1) Nearly 30 of the 50 passengers were women. Just show Aadhar and travel free. Is this fair? Is it equality?
2) 20… pic.twitter.com/2TfkzF88IA
या पोस्टच्या शेवटी किरण कुमार लिहितात की, आम्ही मतांसाठी मोफत भेट देण्याच्या दुष्चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. भविष्यात यामधून बाहेर पडणं कठीण होईल. किरण कुमार यांच्या या पोस्टवर आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काही लोक या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम केलं जात आहे, मोफत प्रवासाच्या माध्यमातून महिलांना सहजपणे उत्पन्नाचं साधन मिळवता येत आहे, असा दावा या योजनेचं समर्थन करणाऱ्यांकडून केला जात आहे.