शाळकरी मुलांना पॉकेटमनी द्यावा का? तज्ज्ञांनी दिला खूप महत्वाचा सल्ला, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:41 AM2022-06-15T10:41:52+5:302022-06-15T10:42:10+5:30
मुलांच्या हाती ‘नको त्या वेळी’ आणि खूप लवकर पैसा मिळाला तर ती ‘वाया’ जातील की काय, अशी एक भीती कायम पालकांच्या मनात असते
सर्वच पालकांपुढे कायम एक मोठा प्रश्न उभा असतो, तो म्हणजे आपल्या शाळकरी मुलांना पॉकेटमनी द्यावा की न द्यावा? त्याबद्दल पालकांच्या मनात कायम द्विधा मन:स्थिती असते. मुलांच्या हाती ‘नको त्या वेळी’ आणि खूप लवकर पैसा मिळाला तर ती ‘वाया’ जातील की काय, अशी एक भीती कायम पालकांच्या मनात असते; पण तज्ज्ञांच्या मते, मुलांना पॉकेटमनी देणं हे त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं चांगलं ठरू शकतं. पैसा कसा वापरावा याचं ज्ञान मुलांना वेळीच मिळालं तर भविष्यात त्यांच्या हातून मोठ्या चुका होत नाहीत आणि जबाबदारीनं ते पैशाचा उपयोग करतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे, मुलांना दिलेला पॉकेटमनी काही फार नसतो, त्याचा चुकीचा वापर झाला, निर्णय घेण्यात मुलं चुकली, तर फार नुकसान होत नाही; पण त्यामुळे पैशाचं व्यवस्थापन आणि पैशांच्या बाबतीत आपली जबाबदारी यांचं भान मुलांना येऊ शकतं. तुमच्या कुटुंबातील मुलं काय आहेत, तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, यावर पॉकेटमनी द्यावा की न द्यावा हे मुख्यत: अवलंबून असलं, तरी समजा तुम्ही मुलांना पॉकेटमनी देण्याचा निर्णय घेतलात त्याबाबत मुलांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत पालक आणि मुलं दोघांमध्येही स्पष्टता असावी. विशेष म्हणजे तुम्ही घरात जेव्हा कोणत्याही कारणासाठी पैसा खर्च करता, त्यामागे तुमचा काय विचार असतो, हेही मुलं बघत असतात, त्यातून शिकत असतात. त्यामुळे पैशांबाबतचा आपला दृष्टिकोन काय, कसा आहे, हे आपणदेखील तपासून पाहिलं पाहिजे.
पॉकेटमनीमुळे मुलं बऱ्याच गोष्टी शिकतात. पैशाची किंमत, पैसा एकदा हातातून गेला म्हणजे गेला, पैसा खर्च करणं सोपं आहे; पण तो कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात, पैशांची बचत, एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करणं म्हणजे दुसरी एखादी वस्तू खरेदी करण्याची संधी गमावणं, कारण आहे त्या पैशांतच तुम्हाला तुमचं बजेट सांभाळायचं आहे.. थोडेसे पैसे हातात देऊन मुलांना इतक्या गोष्टी शिकायला मिळत असतील, तर पॉकेटमनी वाईट नक्कीच नाही; पण त्याकडे पालकांचंही बारीक लक्ष असायला हवं.