तुरुंग अधीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; सत्येंद्र जैन तुरुंगात पुन्हा एकाकीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 08:43 AM2023-05-16T08:43:38+5:302023-05-16T08:45:31+5:30
सत्येंद्र जैन यांनी एकाकीपणा आणि वैफल्यग्रस्ततेची कारणे देत, ११ मे रोजी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून आपल्या सेलमध्ये दोन ते तीन सहकारी कैद्यांना ठेवण्यात यावे, अशी विनंती केली होती.
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या सेलमधील दोन सहकारी कैद्यांना तुरुंग प्रशासनाने हलविले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तुरुंग अधीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
सत्येंद्र जैन यांनी एकाकीपणा आणि वैफल्यग्रस्ततेची कारणे देत, ११ मे रोजी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून आपल्या सेलमध्ये दोन ते तीन सहकारी कैद्यांना ठेवण्यात यावे, अशी विनंती केली होती. मनोचिकित्सकांनी एकटे न राहण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. या पत्राची दखल घेत, तुरुंग क्रमांक सातच्या अधीक्षकांनी जैन यांच्या तुरुंगात दोन कैद्यांना हलविले, परंतु तुरुंग प्रशासनाला ही माहिती मिळताच, जैन यांच्यासोबत ठेवलेल्या दोन कैद्यांना तिथून काढण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय जैन यांच्या सेलमध्ये कैद्यांची संख्या वाढविण्याचे अधिकार तुरुंग अधीक्षकांना नाहीत, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रशासनाला न विचारताच, हा निर्णय घेतल्याबद्दल अधीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात जामीन याचिका
दरम्यान, जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. गेल्या वर्षी ३० मेपासून सत्येंद्र जैन तुरुंगवास भोगत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका गेल्या महिन्यात ६ एप्रिल रोजी फेटाळली होती.