पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला मार्ग दाखवण्यासाठी पाकिस्तानने पाठवले 2.86 लाखांचे बिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 12:48 PM2018-02-19T12:48:45+5:302018-02-19T12:58:39+5:30
तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. त्यावेळी मोदींच्या विमानाला 'रुट नॅव्हीगेशन' म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानने भारताला 2.86 लाखाचे बिल पाठवले आहे.
नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. त्यावेळी मोदींच्या विमानाला 'रुट नॅव्हीगेशन' म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानने भारताला 2.86 लाखाचे बिल पाठवले आहे. माहिती अधिकारातून लोकेश बात्रा यांनी ही माहिती मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या 11 देशांच्या दौ-यासाठी इंडिया एअरफोर्सच्या विमानाचा वापर केला.
25 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान मोदी रशिया आणि अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परत येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विनंतीवरुन त्यांनी लाहोरमध्ये थांबा घेतला होता. त्यावेळी रुट नॅव्हीगेशनपोटी पाकिस्तानकडून 1.49 लाखाचे शुल्क आकारण्यात आले. आरटीआय अंतर्गत पाकिस्तानातील भारतीय दूतावासातून मिळालेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आलीय. लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शरीफ यांनी मिठी मारुन मोदींचे स्वागत केले होते.
त्यावेळी मोदींच्या धावत्याभेटीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. इंडियन एअरफोर्सच्या बाईंग 737 या विशेष विमानाने मोदी पावणेपाचच्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरले. त्यानंतर विशेष हॅलिकॉप्टरने ते शरीफ यांच्या रावळपिंडी निवासस्थानी गेले. त्या दिवशी शरीफ यांचा वाढदिवस आणि दोन दिवसांनी नातीचे लग्न केले होते.
2016 साली 22 आणि 23 मे मोदी इराण दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाने पाकिस्तानवरुन उड्डाण केले होते. त्यासाठी 77,215 रुपये रुट नॅव्हीगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. त्याचवर्षी 4 आणि 6 जूनला कतारला जातान पाकिस्तानवरुन मोदींच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यासाठी 59,215 रुपयांचे बिल पाठवले आहे.