'उद्धव ठाकरेंचं ते भाषण दाखवा, १ हजार मिळवा'; फडणवीसांची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 08:41 PM2023-06-28T20:41:26+5:302023-06-28T20:42:36+5:30
मुंबईत उद्धव ठाकरेंचा मताचा टक्का कमी झालाय, मराठी आणि नॉन मराठीमध्येही मतं कमी झाले आहेत.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अमर्याद टीका करताना पाहायला मिळत आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील भाजपच्या कार्यक्रमात समान नागरी कायदा विषयाला हात घातला. या विषयावर बोलताना मोदींनी मुस्लिमांना आवाहनही केलंय. त्यानंतर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावरुन, आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबईत उद्धव ठाकरेंचा मताचा टक्का कमी झालाय, मराठी आणि नॉन मराठीमध्येही मतं कमी झाले आहेत. त्यामुळे, हा मतांचा टक्का भरुन काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लीम वोट बँक जवळ केलीय.उद्धव ठाकरेंकडून सध्या मुस्लिम वोट बँकेला जवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेच आपल्यासाठी नवीन मसिहा असल्याचं त्यांना वाटतंय. म्हणूनच, आज समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चेसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या पदाधिकार ना शरद पवाराकडे गेले, ना अखिलेश यादवकडे गेले, ते थेट उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ होते, मग उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायद्याल बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, पत्रकाराने प्रश्न केला की, उद्धव ठाकरे म्हणतात हा महत्त्वाचा विषय नाही, मी विकासाबद्दल बोलतो, मी पाणी, रस्ते आणि वीज यासंदर्भात बोलतो, असा त्यांचा नवी अप्रोच आहे, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा दुर्लक्षित केल्यावर काय? पत्रकाराच्या या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी थेट ऑफरच दिली आहे.
उद्धव ठाकरेंचं वीज, रस्ते, पाणी आणि विकासासंदर्भातील एक भाषण दाखवा, मी तुम्हाला १ हजार रुपये देतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ऑफर आणि चॅलेंजच दिलं आहे. १ हजार रुपये घ्या माझ्याकडून, उद्धव ठाकरे तसं बोलतच नाहीत, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, समान नागरी कायद्यावर भाष्य करण्याचं धाडस दाखवलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.