साक्षी, सिंधूच्या पदव्या दाखवा - केजरीवालांची मागणी
By admin | Published: August 24, 2016 08:51 AM2016-08-24T08:51:01+5:302016-08-24T12:17:05+5:30
हैदराबाद व विजयवाडासह संपूर्ण भारत सिंधूच्या ऑलिंपिक रौप्य पदकाचा आनंद साजरा करत असताना, अरविंद केजरीवालांनी पी. व्ही. सिंधूच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे
Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
हैदराबाद व विजयवाडासह संपूर्ण भारत सिंधूच्या ऑलिंपिक रौप्य पदकाचा आनंद साजरा करत असताना, अरविंद केजरीवालांनी पी. व्ही. सिंधूच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सिंधू ही केवळ एक खेळाडू नसून भारत पेट्रोलियममध्ये असिस्टंट स्पोर्ट्स मॅनेजर या पदावर कार्यरत होती, आणि ऑलिंपिकमधल्या पराक्रमानंतर भारत पेट्रोलियमने सिंधूला डेप्युटी स्पोर्ट्स मॅनेजर अशी बढती दिली आहे. केजरीवालांनी सिंधूला मुळात नोकरीच कुठल्या शैक्षणिक पात्रतेसाठी दिली, असा सवाल विचारला आहे. भारत पेट्रोलियमला पाठवलेल्या पत्रामध्ये केजरीवालांनी एका सुशिक्षित आम आदमीची नोकरी हिसकावून घेतली असल्याचा आरोप केला असून सिंधूच्या पदव्या जाहीर कराव्यात, अशी मागणी कंपनीकडे केली आहे.
या उच्च पदाच्या नोकऱ्या करण्यासाठी भारतातले युवक युवती अहोरात्र अभ्यास करून पदव्युत्तर शिक्षण, एमबीए आदी परीक्षा उत्तीर्ण होतात, मात्र सिंधू साधी पदवीधारक तरी आहे का ? असा सवाल या निमित्तानं केजरीवालांनी विचारला आहे.
केवळ सिंधूच नाही, तर रेल्वेने नोकरी दिलेली व ऑलिंपिक कास्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिचेही शिक्षण काय आहे, आणि कुठल्या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे रेल्वेने तिला नोकरी दिली असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला आहे.
आधीचं काँग्रेस सरकार आणि आताचं मोदी सरकार जनतेच्या पैशाची लूट करत असून सरकारी आस्थापनांमध्ये काही कामाचे नसलेल्या व किमान शिक्षणही न झालेल्या खेळाडूंना नोकऱ्या वाटण्यात येत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.
गेली अनेक वर्षे खेळाडूंच्या नोकऱ्यांमध्ये काही हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांची ही मिलीभगत असल्याचा आरोप करताना, केजरीवालांनी या मुद्यावरून जंतरमंतरवर जन-आंदोलन छेडण्याची हाळी दिली आहे.