'आधी तुमची पदवी दाखवा', मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:45 PM2020-01-21T17:45:10+5:302020-01-21T17:45:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमापूर्वीच सिनेअभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली. परीक्षा पे चर्चा करण्यापूर्वी पदवी प्रमाणपत्र दाखवा, असा टोला प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. तर, सोशल मीडियातूनही काही ट्रोलर्संकडून मोदींच्या या कार्यक्रमावर टीका करण्यात येत आहे. याचदरम्यान, प्रकाश राज यांनीही ''परीक्षा पे चर्चा 2020 करने से पहले डिग्री का कागज दिखाओ'', असे ट्विट करत मोदींना लक्ष्य केले. प्रकाश राज यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामध्ये मोदींना ट्रोल करणाऱ्या आणि राज यांचं समर्थन करणाऱ्याही प्रतिक्रिया आहेत.
#ParikshaPeCharcha2020 karne se pehle degree ka kagaz dikhao...#justasking
— Prakash Raj (@prakashraaj) January 20, 2020
दरम्यान, 'परीक्षांवर चर्चा' करणाऱ्या पंतप्रधानांनी रोजगारावर सुद्धा चर्चा करावी' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. मोदींनी, परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं राहावं याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता पंतप्रधान मोदी आता तरुणांच्या रोजगारासंबंधात चर्चा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचा टोला राष्ट्रवादीने मोदींना लगावला आहे.
दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे केलेले सगळे दावे फोल ठरले. प्रत्यक्षात, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला. तरूणांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला देण्यात आला. देशात बेरोजगारी लक्षणीयरित्या वाढली आहे. आहेत तेच रोजगार जात आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने रोजगारनिर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरूणांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.