गुन्ह्यांचा रहस्यभेद करते नार्काे, नेमकी कशी असते ही चाचणी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 06:56 AM2022-11-27T06:56:22+5:302022-11-27T06:56:56+5:30
नार्काे चाचणी हा प्रकार फाॅरेन्सिक सायकाॅलाॅजीमध्ये येताे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा न्यायदानासाठी केलेला वापर म्हणजे फाॅरेन्सिक विज्ञान. त्यातील ही एक शाखा आहे.
मनोज रमेश जोशी, वृत्त संपादक
नेकदा गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर मार्ग सापडत नाही. बरेच गुन्हेगार खूप हुशार असतात. गुन्हा कसा लपवता येईल, पुरावे कसे मिटवता येतील, याचा खूप अभ्यास करतात. योजना आखून योग्य वेळेवर डाव साधतात. अशा प्रकरणांचा तपास करणे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान असते. तपास खूप गुंतागुंतीचा होतो. अशावेळी हा गुंता सोडविण्यासाठी मदत घेतली जाते फॉरेन्सिक विज्ञानाची. आपण टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये डीएनए, फिंगरप्रिंट्स इत्यादी शब्द ऐकले असतील, पाहिलेही असतील. त्यात अजून एक प्रकार येतो तो म्हणजे नार्को चाचणी. असं म्हणतात गुन्हेगार कितीही कुख्यात असला तरी तो या चाचणीत बरेच भेद उघड करतो आणि तपासाला नवी दिशा देतो. सध्या श्रद्धा वालकर प्रकरणावरून नार्को चाचणीची चर्चा सुरू आहे. तिचा निर्दयी खून केल्याचा आरोप असलेला आफताब याची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
नार्को चाचणी का केली जाते?
गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी या चाचणीचा आधार घेतला जातो. मात्र, गुन्हेगार अचेतन किंवा अर्धवट शुद्धीवर असतो. काही पुरावे, माहिती, नोंदविलेल्या साक्षी इत्यादींमध्ये काही मिसिंग लिंक जोडल्या जातात. गुन्हा कसा केला, का केला, पुरावे कसे नष्ट केले इत्यादी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न असतो.
चाचणी आराेपीच्या संमतीनेच
नार्काे चाचणीतील माहिती, कबुलीजबाब हा न्यायालयात पुरावा म्हणून मान्य केला जात नाही. आराेपीची संमतीही या चाचणीसाठी घ्यावी लागते. आराेपीवर ती लादता येत नाही. आराेपीची संमती आहे, हे न्यायालयाला सांगितल्यानंतरच न्यायालय तशी परवानगी देते.
आराेपपत्रात नार्काेचा उल्लेख करता येत नाही
परिस्थितीजन्य व पुष्टीदायक पुरावे गाेळा करण्यासाठी नार्काे चाचणीचा उपयाेग हाेताे. त्यामुळे तपासाच्या दृष्टिकाेनातून या चाचण्या खूप महत्त्वाच्या ठरतात. परंतु, या चाचण्यांच्या निष्कर्षांना न्यायालयात पुरावा म्हणून मान्यता नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नार्काे चाचणीच्या आधारे पुरावे गाेळा केले, हे आराेपपत्रात लिहू शकत नाही.
- शिरीष इनामदार, निवृत्त अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र
पाॅलिग्राफ चाचणी
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आराेपी आफताबची ही चाचणी करण्यात आली. काेणत्याही घटनेला मानवाच्या भावनात्मक प्रतिक्रिया उमटतात. भय, संताप, प्रेम, इगाे, आनंद, धाडस, दु:ख इत्यादी. हे तसेच शरीरातील रक्तदाब, हृदयाचे ठाेके, श्वासाेच्छ्वासाची गती, नाडीचे ठाेके, इलेक्ट्रिकल प्रतिक्रिया, आवाजातील बदल हे पाॅलिग्राफ चाचणीद्वारे हेरले जातात.
कशी करतात चाचणी?
आरोपीला काही औषधे दिली जातात. त्यानंतर तो अचेतन अवस्थेत जातो. त्यापूर्वी आराेपीच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात. त्यानंतरच चाचणी करण्यात येते.
सोडियम पेंटोथल, स्कोपोलमाइन किंवा सोडियम अमाईटल या औषधांचे इंजेक्शन दिले जाते. त्यांना ट्रूथ ड्रग असेही म्हणतात. आरोपीचे वय, वजन, इत्यादी गोष्टी विचारात घेऊन औषधांचा डोस ठरविला जातो. डाेस जास्त झाल्यास आराेपीवर दुष्परिणाम हाेऊ शकतात.
ब्रेनमॅपिंग चाचणीत मेंदूतून अशा लहरी निर्माण हाेतात. लाल आणि निळ्या रेषा समांतर आल्या, तर आराेपीला गुन्ह्याबद्दल माहिती असते.
दाेन्ही रेषा लाल रेषेपासून दूर असल्यास आराेपीला गुन्ह्याबाबत माहिती नसल्याचे संकेत मानले जातात.
ब्रेन मॅपिंग
या चाचणीसाठी ‘पी-३०० मर्मर’ नावाचे यंत्र वापरले जाते. आराेपीच्या डाेक्यावर ते लावण्यात येते. घटनेशी किंवा पीडित व्यक्तीशी संबंधित छायाचित्रे, व्हिडीओ, आवाज इत्यादी दाखविण्यात येतात, ऐेकविण्यात येतात. त्यावर आराेपीच्या मेंदूमधील इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हाेणारे बदल हेरले जातात. आराेपीचा त्याच्याशी संबंध जाेडून तपासाला दिशा मिळते.