"मला तुमच्या सर्वांची आठवण येते, स्वप्न पूर्ण करूनच परत येईन..."; श्रेयाचा आईला शेवटचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:25 PM2024-07-29T15:25:59+5:302024-07-29T15:32:52+5:30
श्रेयाच्या आईने बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील राजेंद्र नगर कोचिंग दुर्घटनेत उत्तर प्रदेशच्या श्रेया यादवला आपला जीव गमवावा लागला आहे. IAS बनण्यासाठी गेलेल्या श्रेयाचा मृतदेह घरी आल्यावर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. श्रेयाच्या आईची रडून रडून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. श्रेयाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी मुलीशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी मुलीने मला तुमच्या सर्वांची आठवण येते असं म्हटलं. तसेच सर्वांची चौकशी देखील केली. स्वप्न पूर्ण करून घरी परत येणार असल्याचं सांगितलं.
श्रेयाच्या आईने बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "मुलीने मी आयएएस होऊनच येणार असल्याचं सांगितलं होतं, पण कोणाला माहीत होतं की पुढे हे असं होणार आहे. आमची मुलगी आम्हाला सोडून गेली. यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं?" असं श्रेयाच्या आईने म्हटलं आहे.
राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, त्यात आंबेडकर नगरमधील श्रेयाचाही समावेश होता. सोमवारी सकाळी विद्यार्थिनी श्रेया यादवच्या मृतदेहावर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रेयाच्या हसिमपूर बरसावन गावात मोठ्या संख्येने लोक जमले होते.
श्रेया यादवची पुस्तकं, नोट्स तिच्या घरात पडून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सांगत आहेत की, मुलीचं आयएएस होण्याचं स्वप्न होतं, परंतु निष्काळजीपणानमुळे तिला जीव गमवावा लागला आहे. श्रेयाच्या मावशीने सांगितलं की, श्रेया ऑफिसर होण्यासाठी गेली होती. आता सगळी स्वप्नं गेली. ती अभ्यासात खूप हुशार होती. मी छोटी नोकरी करणार नाही असं ती नेहमी म्हणायची. श्रेयाने एप्रिलमध्ये कोचिंग क्लास जॉईन केला होता.