अयोध्येत 'श्रीराम' तर साऊथमध्ये 'मुरुगन'! लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी DMK चा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:04 PM2024-03-13T17:04:40+5:302024-03-13T17:08:03+5:30
Lord Murugan Festival:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अयोध्येत उभ्या राहिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिराला मुद्दा बनवून, तो व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. याचा परिणाम अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दिसत आहे. मात्र, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या द्रमुकनेही (डीएमके) यावर तोडगा शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. आता तामिळनाडू सरकार भगवान मुरुगन यांच्या आश्रयाला गेले असून भगवान मुरुगन यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन करणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन जून अथवा जुलै महिन्यात केले जाणार आहे. या सम्मेलनात भगवान मुरुगन यांच्यावर प्रदर्शन आणि रिसर्च पेपर सादर केले जातील, असे हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स मंत्री पीके शेखरबाबू यांनी सांगितले तामिळनाडूमध्ये राजकीय पक्षांचा भगवान मुरुगनयांच्याकडील कल नवी गोष्ट नाही. भाजपने 2020 मध्ये 'वेल यात्रा' आयोजित केली होती, तेव्हा एल मुरुगन हे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते.
डीएमके पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांना शरण -
तामिळनाडूमध्ये 'मंदिर पॉलिटिक्स' सुरू झाले आहे. महत्वाचे म्हणजे, डीएमके हा नास्तिक विचारधारा असलेला पक्ष मानला जातो. पण, पक्षातील नेत्यांना मंदिर अथवा मशिदीत जाण्यापासून रोखले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांच्या आश्रयाला जाताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डीएमकेची ही खेली असल्याचे मानले जात आहे. त्यांना आशा आहे की, याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो.
भाजपची प्रतिक्रिया? -
डीएमकेच्या या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे राज्य सचिव आर श्रीनिवासन म्हणाले, 'सर्व प्रथम त्यांनी (डीएमके) केंद्र सरकारच्या योजनांची कॉपी केली आणि त्यावर त्यांच्या नावाचे स्टिकर्स लावले आहे. आता ते आमच्या विचारधारेची आणि राजकारणाची नक्कल करत आहेत. भगवान मुरुगन यांना केवळ तामिळनाडूपर्यंतच मर्यादित ठेवले जाऊ शकत नाही. कारण त्यांची पूजा संपूर्ण देशात केली जाते. लोक अशा प्रकारच्या चालीत अडकणार नाहीत."