राम मंदिरात ‘हनुमान’ प्रकटले! रामललाचे दर्शन घेतले, अद्भूत घटनेने भक्तगण नतमस्तक झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:52 AM2024-01-24T11:52:24+5:302024-01-24T11:56:49+5:30

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एक वेगळाच अनुभव आल्याचे सांगितले जात आहे.

shri ram janm bhoomi tirtha kshetra trust told about devotees experience the miraculous incident in ram mandir ayodhya | राम मंदिरात ‘हनुमान’ प्रकटले! रामललाचे दर्शन घेतले, अद्भूत घटनेने भक्तगण नतमस्तक झाले

राम मंदिरात ‘हनुमान’ प्रकटले! रामललाचे दर्शन घेतले, अद्भूत घटनेने भक्तगण नतमस्तक झाले

Ayodhya Ram Mandir: मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामललांच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. मात्र, यावेळी भाविकांना एका अद्भूत घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, असे सांगितले जात आहे.

रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनौ येथूनच लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. या धामधुमीत मंगळवारी सायंकाळी एक विशेष घटना घडली.

हनुमानजी स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने एक्सवर एक पोस्ट करत राम मंदिरात घडलेल्या चमत्कारिक प्रसंगाबाबत माहिती दिली आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरात आज घडलेल्या एका सुंदर घटनेचे वर्णन, असे कॅप्शन देण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ५.५० च्या सुमारास राम मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून एका वानराने गाभाऱ्यात प्रवेश केला अन् थेट उत्सवमूर्तीजवळ जाऊन बसले. इतक्यात गाभाऱ्याच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी हे पाहिले. सदर वानर रामललाच्या मूर्तीला धक्का लावतील अन् मूर्ती खाली पडतील, अशी भीती वाटल्याने सुरक्षा रक्षक गाभाऱ्याच्या दिशेने धावले. सुरक्षा रक्षकांची चाहूल लागताच वानर शांतपणे उत्तरेकडील दरवाजाकडे गेले. मात्र, तेथील दार बंद असल्याने ते वानर पूर्वेकडील दरवाज्याकडे धावले. येथे असलेल्या भाविकांच्या गर्दीतून वाट काढत कोणालाही त्रास न देता पूर्वेकडील दरवाजातून बाहेर पडले. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, आमच्यासाठी जणू हनुमानजी स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत, असाच अनुभव आल्याची प्रतिक्रिया देण्यात आली.

दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी आठ ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राम मंदिरात सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास मनाई आहे. मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप, इयरफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन मंदिरात जाता येणार नाही. राम मंदिरात बाहेरून प्रसाद नेण्यास मनाई आहे. रामललाच्या आरतीला भाविकांना हजेरी लावायची असेल, तर त्यांना रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून ‘पास’ घ्यावा लागेल. हा 'पास' मोफत आहे. कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 
 

Web Title: shri ram janm bhoomi tirtha kshetra trust told about devotees experience the miraculous incident in ram mandir ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.