श्रीराम मंदिर संकल्प कधी डळमळीत झाला नव्हता; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:47 AM2024-01-23T06:47:07+5:302024-01-23T06:47:29+5:30
अमित शाह यांनी दिल्लीच्या बिर्ला मंदिरात जाऊन सोमवारी देवदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ‘सुंदरकांड’चे वाचन केले.
नवी दिल्ली : गेल्या पाच शतकांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. अयोध्येत श्रीराममंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. हा क्षण प्रत्यक्षात यावा म्हणून आधीच्या पिढ्यांतील अनेक लोकांनी मोठा त्याग केला आहे. मात्र, रामजन्मभूमीवर पुन्हा मंदिर बांधण्याचा संकल्प कोणत्याही प्रकारच्या भीती, दहशतीमुळे कधीही डळमळीत झाला नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी दिल्लीच्या बिर्ला मंदिरात जाऊन सोमवारी देवदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ‘सुंदरकांड’चे वाचन केले. शाह यांनी यावेळी सांगितले की, अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठीचा संघर्ष अनेक शतके सुरू होता. पाच शतके केलेली प्रतीक्षा सोमवारी संपली. ज्यांच्या योगदान, बलिदानामुळे हे शक्य झाले, त्या सर्वांना अभिवादन करतो. अनेकदा अपमान, छळ करण्यात आला, तरी त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. या संघर्षात विश्व हिंदू परिषद, हजारो संतमहंत तसेच अज्ञात लोकांचा सहभाग आहे. त्यांच्यामुळेच आजचे यश दिसत आहे, असे शाह म्हणाले.