मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेस; रेल्वेची प्रवाशांना भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:31 PM2018-08-24T12:31:52+5:302018-08-24T12:32:22+5:30
तामिळनाडूतील मदुराई येथून सुरु होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असेल. हा प्रवास 15 दिवसांचा असेल.
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी भेट आणली आहे. यंदाच्या वर्षी भारतातील मदुराईपासून नेपाळपर्यंत रामायणाशी संबंधित असलेल्य़ा विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी एका विशेष एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामायण एक्स्प्रेस असे या रेल्वेगाडीचे नाव आहे. तामिळनाडूतील मदुराई येथून सुरु होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असेल. हा प्रवास 15 दिवसांचा असेल.
14 नोव्हेंबर 2018 रोजी ही एक्स्प्रेस मदुराईमधून प्रवासासाठी बाहेर पडेल. प्रत्येक प्रवाशाला 15 हजार 810 रुपयांमध्ये प्रवास, राहणे, जेवण यांचा लाभ घेता येणार आहे. मदुराईमधून निघालेली रेल्वे दिंडीगल, चेन्नई मध्य, करुर, सेलम, जोरापेट, इरोड, कटपाडी, रेनीगुंटा मार्गे हॉस्पेट येथे येईल. त्यानंतर नाशिक रोड स्थानकामध्ये थांबून पंचवटी येथिल मंदिरांमध्ये प्रवाशांना भेट देता येईल. त्यानंतर रेल्वेचा पुढचे थांबे चित्रकूट धाम, दरभंगा, सीतामढी, जनकपूर, अयोध्या, नंदीग्राम, अलाहाबाद, शृंगवेर्नपूर, रामेश्वरम असे असतील.
या एक्स्प्रेसआधी प्रवाशांना श्रीलंकेत रामायणासंदर्भातील स्थानांना भेट देण्यासाठी एका यात्रेचे आयोजन केले आहे. तेथे जाण्यायेण्याचा विमानप्रवास, पाच रात्री, सहा दिवसांचे राहाणे, जेवण, व्हीसा व प्रवास इन्शुरन्स यासाठी 41 हजार रुपये आकारले जाणार आहेत.