इस्लामिक अभ्यास प्रवेश परीक्षेत शुभम यादव अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 02:08 AM2020-11-20T02:08:12+5:302020-11-20T02:08:18+5:30
एकमेकांचे धर्म समजून घेणे महत्त्वाचे
जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या शुभम यादवने केंद्रीय विद्यापीठातील इस्लामिक अभ्यास प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावीत विक्रम स्थापित केला आहे.
दिल्ली विद्यापीठातून तत्वज्ञान विषयात पदवी मिळविल्यानंतर काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठात असलेल्या पदव्युत्तर इस्लामिक अभ्यासक्रमासाठी तो पात्र ठरला आहे. आजवर मुस्लिम तसेच काश्मिरी विद्यार्थीच या परीक्षांमध्ये अव्वल ठरत आले आहेत. इस्लामिक अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षेत पहिल्यांदाच २१ वर्षीय हिंदू विद्यार्थी शुभम सर्वप्रथम आला आहे. यशाबद्दल तो म्हणाला, विविध धर्मांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एकमेकांचे धर्म समजून घेणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत कोणत्याही धर्माचा सखोलपणे अभ्यास केला जात नाही, तोपर्यंत तो धर्म वा त्या धर्मातील उच्च तत्वज्ञान समजणार नाही. ( वृत्तसंस्था )
धर्म समजणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज...
शुभम म्हणाला, मला इस्लामिक अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतीय प्रशासन सेवेत जायचे आहे. सद्यस्थितीत धर्म समजून घेणाऱ्या लोकांची प्रशासनाला आवश्यकता आहे. त्याने दिल्ली विद्यापीठातील विधि अभ्यासक्रमासाठीही प्रवेश परीक्षा दिली असून, तो भविष्यात काश्मीर विद्यापीठात इस्लाम धर्माचा अभ्यास करणार आहे.