पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:19 AM2023-10-11T11:19:00+5:302023-10-11T11:20:38+5:30
Shubman Gill: शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला.
नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी येत आहे. भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आज चेन्नईहून अहमदाबादला रवाना होणार आहे. त्याची प्रकृती बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरू राहणार असून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो.
शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला. आता गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. येथे १४ ऑक्टोबरला भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. बीसीसीआयकडून गिलच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की गिल आज अहमदाबादला पोहचेल आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो राहील, असं सांगण्यात येत आहे. मात्र आगामी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गिल खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शुभमन गिल यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्या शरीरातील प्लेटलेट संख्या एक लाखापेक्षा कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, केवळ एक रात्र राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहमदाबादच्या उन्हात एकदिवसीय सामने खेळण्यासाठी उत्तम फिटनेस आवश्यक आहे. त्यामुळे गिलसमोर सामन्यासाठी फिट होण्याचे मोठे आव्हान असेल. शुभमन गिल हा भारताकडून यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २० डावात १२३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७२.३५ आणि स्ट्राइक रेट १०५.०३ आहे. त्याने या वर्षी वनडेत द्विशतकही झळकावले आहे. शुबमन गिल हा विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. अहमदाबादच्या मैदानात गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन ही भारतासाठी अत्यंत आनंददायी बाब असेल.
India entertains Afghanistan in Delhi 🏏
— ICC (@ICC) October 11, 2023
Can the hosts make it two wins in two? 🤔#CWC23 | #INDvAFGpic.twitter.com/qVwa32tWuG
वनडे विश्वचषकाच्या सलामी लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा सामना करीत विजय मिळविणारा भारतीय संघ बुधवारी दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर एकतर्फी वर्चस्व गाजविण्यास उत्सुक आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा याने वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार खेळण्याचे आमच्यापुढे आव्हान असेल, असेही म्हटले आहे. अफगाणिस्तानचा मारा ऑस्ट्रेलियासारखा मुळीच नाही. कोटला मैदान आकाराने लहान असल्याने षट्कारांची आतषबाजी अपेक्षित आहे. विश्वचषकाआधी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे स्वरूप वेगळे आहे. विराट घरच्या मैदानावर खेळणार असल्याने चेन्नईतील खेळीची पुनरावृत्ती करण्याची त्याच्याकडून अपेक्षा बाळगण्यात येत आहे.