वयाच्या 10व्या वर्षी झाला खटला! 43 वर्षे तारखेवर 'तारीख', अखेर 53व्या वर्षी मिळाला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:09 PM2022-10-12T14:09:15+5:302022-10-12T14:10:23+5:30
बिहारमधील श्याम बिहारी सिंग यांना कोर्टाकडून 53 वर्षांनी न्याय मिळाला आहे
पाटणा : आयुष्यात कोर्ट, कचेरी आणि दवाखाना कोणाच्या वाट्याला येऊ नये असे बोलले जाते. याचाच प्रत्यय देणारी घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यात घडली आहे. कारण इथे एका व्यक्तीला आयुष्यातील 43 वर्षे कोर्टाची पायरी चढावी लागली. ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमराव पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. जिथे चोंगई ब्लॉकचे रहिवासी श्याम बिहारी सिंग यांना तब्बल 43 वर्षांनंतर न्याय मिळाला. डुमरावमधील चोंगई येथे राहणारे श्याम बिहारी सिंग हे 10 वर्षे पाच महिन्यांचे असताना त्यांच्यावर खटला दाखल झाला होता. खरं तर सप्टेंबर 1998 मध्ये त्यांच्यांविरुद्ध डुमराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 43 वर्षे खटला चालल्यानंतर त्यांना वयाच्या 53व्या वर्षी न्याय मिळाला आहे.
43 वर्षे प्रतिक्षेत
दरम्यान, तब्बल 43 वर्षे न्यायाच्या आशेने न्यायालयात गेलेल्या श्याम बिहारी सिंग यांना अखेर न्याय मिळाला आहे. श्याम बिहारी सिंग यांच्याविरोधात दुकानात हल्ला, गोळीबार आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी श्याम बिहारी हे अवघे साडे दहा वर्षांचे होते. पोलिसांनी श्याम बिहारी सिंग यांच्यावर जमावामध्ये सहभागी असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. बक्सर न्यायालयात हा खटला वर्षानुवर्षे चालत राहिला. अखेर त्यांना वयाच्या 53व्या वर्षी न्याय मिळाला आहे.
कोर्टाकडून मोठा दिलासा
मंगळवारी श्याम बिहारी सिंग यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती डॉ. राजेश सिंग यांनी श्याम बिहारी हे दोषी नसल्याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे श्याम बिहारी सिंग यांनी तेथील उपस्थित पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, "निकालाला उशीर होत आहे असे वाटायचे. पण उशिरा का होईना मला न्याय मिळेल असा विश्वास होता." तसेच ज्या आरोपातून मी स्वत:ला मुक्त करण्याची विनंती करत होतो. न्यायालयाने मला त्याच्यापासून मुक्त केले आहे. हा माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण असल्याचे श्याम बिहारी सिंग यांनी सांगितले.
श्याम बिहारी सिंग यांना न्याय मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तर त्यांच्या परिजनांनी त्यांच्या धैर्याचे आणि सहनशीलतेचे कौतुक केले आहे. न्यायासाठी त्यांनी 43 वर्षे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाट पाहिली. त्याचबरोबर या काळात त्यांनी पोलीस ठाण्यात किंवा कुठेही वकिली केली नाही, या त्यांच्या विश्वासालाही दाद द्यावी लागेल. श्याम बिहारी सिंग यांना नक्कीच न्याय मिळेल असा पूर्ण विश्वास असायचा. असे त्यांच्या परिसरातील नागरिकांनी म्हटले.