भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांना अखेरचा निरोप, हिमाचलमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:03 AM2022-11-06T06:03:16+5:302022-11-06T06:04:03+5:30
भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांचे शनिवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते १०६ वर्षांचे होते.
सिमला :
भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांचे शनिवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते १०६ वर्षांचे होते. नेगी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. नेगी हे निवडणूक आयोगाचे सदिच्छादूत होते. नेगी यांच्या निधनाबद्दल निवडणूक आयोगाने दु:ख व्यक्त केले आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले मतदारच नव्हते, तर लोकशाहीवर अढळ श्रद्धा ठेवणारे नागरिक होते. त्यांनी लाखो लोकांना मतदानासाठी प्रेरित केले. त्यांनी मृत्यूपूर्वी २ नोव्हेंबर रोजी टपाल मतपत्रिकेद्वारे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी मतदान केले, असे ट्वीट आयोगाने केले आहे. मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेगी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. लोकशाहीप्रतीचा नेगी यांचा
दृष्टिकोन देशातील तरुणांना प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.
असे बनले भारताचे पहिले मतदार
फेब्रुवारी १९५२ मध्ये देशाची पहिली लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा नेगी हे मुरांगच्या शाळेत शिक्षक होते. शिक्षकी पेशामुळे त्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले होते. ड्यूटी शाँगथांगपासून मुरांगपर्यंत होती, तर त्यांचे मतदान कल्पा येथे होते. ते भल्या सकाळीच ते मतदान केंद्रावर पोहोचले. नेगी यांनी लवकर मतदान करू देण्याची विनंती केली. त्यानंतर ते ड्यूटीसाठी रवाना झाले. कल्पा येथे मतदान केल्याने पहिले मतदार म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले.