विकास पडला बाजूला, ‘राम-राफेल’च चर्चेत; भाजपाच्या होर्डिंग्जवर झळकले अटलबिहारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 08:11 AM2018-11-17T08:11:15+5:302018-11-17T08:11:48+5:30
छत्तीसगड निवडणूक : स्टार प्रचारकांच्या सभा सुरू होताच, प्रचारात आले राष्ट्रीय मुद्दे
योगेश पांडे
रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी संपायला तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची इथे गर्दी व्हायला लागली आहे. काँग्रेस-भाजपाच्या बड्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापू लागले आहे. मात्र स्थानिक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राम मंदिर व राफेल विमाने, नोटाबंदी, घराणेशाही यावरच जास्त भर दिला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यंदा भाजपाच्या होर्डिंग्जवर माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्रही दिसत आहे.
पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागातील समस्यांवर जास्त भर देण्यात आला होता. मात्र दुसºया टप्प्यातील ७२ जागांसाठी २0 डिसेंबरला होणाºया मतदानासाठी भाजपाने विकास तर कॉंग्रेसने गरिबी व भ्रष्टाचार या मुद्द्यांना केंद्रबिंदू केले होते. मात्र गेल्या काही दिवसांत स्टार प्रचारकांच्या सभा सुरू होताच, प्रचाराचे मुद्दे बदलत गेले. काँग्रेसने जीतबो छत्तीसगड मोहीम सुरू केली आहे. मात्र नेत्यांच्या भाषणात ही मोहीम कमी आणि राष्ट्रीय मुद्दे जास्त आहेत. राफेलवरून आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला. गांधी व कॉंग्रेसचे नेते राफेल, नोटाबंदी व भ्रष्टाचार यावरून केंद्रावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे.
भाजपातर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाजू सांभाळली असून, ते ३१ सभा घेणार आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होत असली, तरी ते राम मंदिरावरच बोलत आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा आणायला सुरुवात केली आहे.
दुसºया टप्प्यात अनेक जागा या आदिवासीबहुल आहेत. या जागांवर मूळत: झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील नागरिकांचादेखील अधिक समावेश आहे. येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने तर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमधील अनेक नेत्यांना विविध जबाबदाºया दिल्या आहेत. यात मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे. तर काँँग्रेसतर्फे ७२ मतदारसंघांची जबाबदारी ७२ नेत्यांना दिली आहे.
मोदी, सिंह यांच्याआधी वाजपेयी
२०१३ च्या निवडणुकांमध्ये भाजपचा जाहीरनामा, पक्षाचे होर्डिंग या सर्र्वावर मुख्यमंत्री रमणसिंह व नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र दिसून येत होते. यंदा पोस्टर्स व होर्डिंग्जवर अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र दिसत आहे. भाजपाच्या संकल्पपत्रातदेखील मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याअगोदर अटलजींनाच स्थान देण्यात आले आहे.
चाऊरवाले बाबा : आदिवासीबहुल क्षेत्रात भाजपा नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख रमणसिंग असा न करता ‘चाऊरवाले बाबा’ असा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरिबांना तांदूळ वाटपाच्या योजनेमुळे डॉ.रमणसिंह यांची ओळख ‘चाऊरवाले बाबा’ अशीच आहे. दुर्गम भाग तसेच आदिवासी क्षेत्रात त्यांना केवळ याच नावाने ओळखले जाते.