धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 03:51 PM2024-05-12T15:51:12+5:302024-05-12T15:52:51+5:30
7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील पाच जण आजारी पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील पाच जण आजारी पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. राहुल कुमार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो त्याची आई सीमा आणि विवेक आणि संध्या या दोन भावंडांसह पीलीभीतच्या पुरनपूर तहसीलमधील राहुल नगर कॉलनीतील आपल्या आजी-आजोबांच्या घरी गेला होता.
रिपोर्टनुसार, रात्री संपूर्ण कुटुंबाने इन्स्टंट नूडल्स आणि भात खाल्ला होता. थोड्या वेळानंतर राहुल, त्याची दोन भावंडे, आई आणि मावशी संजू आणि संजना यांची प्रकृती ढासळू लागली. शुक्रवारी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले व नंतर स्थानिक आरोग्य केंद्रात (CHC) उपचारासाठी नेण्यात आले.
सीएचसीमध्ये नेताना राहुलचा मृत्यू झाला तर विवेकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. कुटुंबातील उर्वरित चार सदस्यांवर अद्यापही आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
इंस्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर सहाही जणांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत होता. पूरणपूर आरोग्य केंद्राचे डॉ राशीद यांनी पुष्टी केली की पाच जणांना सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यांनी इन्स्टंट नूडल्ससोबत भात खाल्ला होता. या घटनेत एका मुलाला आपला जीव गमवावा लागला तर कुटुंबातील इतर सदस्य आजारी पडले.