सावधान...! औषधांचे होताहेत साइड इफेक्ट; ५२ टक्के कुटुंबांतील लोकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:36 IST2023-09-09T11:35:58+5:302023-09-09T11:36:07+5:30
सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

सावधान...! औषधांचे होताहेत साइड इफेक्ट; ५२ टक्के कुटुंबांतील लोकांना फटका
नवी दिल्ली : देशातील ५२ टक्के कुटुंबातील एक किंवा त्याहून अधिक सदस्यांना गेल्या पाच वर्षांत कोणत्या ना कोणत्या औषधाचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) जाणवले आहेत. ‘लोकल सर्कल्स’च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात ६८ टक्के पुरुष आणि ३२ टक्के महिलांचा समावेश होता.
सर्वेक्षणात सहभागी ३४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना गेल्या पाच वर्षांत एक-दोन वेळा असा (औषधाचे दुष्परिणाम) अनुभव आला आहे. सहा टक्के लोकांना असा अनुभव दहाहून अधिक वेळा, तीन टक्के लोकांना सहा ते नऊ वेळा, तर नऊ टक्के लोकांना तीन ते पाच वेळा असा अनुभव आला. १८ टक्के
लोकांना याबाबत निश्चितपणे सांगता आले नाही.
असुरक्षित औषधे...
गेल्या १२ महिन्यांत असुरक्षित औषधांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जुलैमध्ये केंद्रीय औषधे गुणवत्ता दर्जा नियंत्रण संघटनेला (सीडीएससीओ) औषधांचे ५१ बॅच दर्जाहीन असल्याचे आढळून आले होते.