मुसेवाला प्रकरण: तिहारमधून रचला हत्येचा कट; बिश्नोई गँगवर संशय, न्यायालयीन चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:52 AM2022-05-31T07:52:28+5:302022-05-31T07:52:45+5:30
घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मुसेवाला यांच्या गाडीवर ३० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरच्या गटाने घेतली आहे. तिहार तुरुंगातून त्याने कट शिजविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मात्र, मुसेवाला यांच्या वडिलांनी सीबीआय किंवा एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी उत्तराखंडमधून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण बिश्नोई गँगचा शार्प शूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या झाली त्या ठिकाणाहून गोळ्यांची ३० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मुसेवाला यांनी दिले होते संकेत
मुसेवाला यांनी यापूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. मुसेवाला यांची दोन गाणी द लास्ट राइड आणि २९५ लगेगी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या गाण्याच्या टायटलमध्येच त्यांच्या मृत्यूचा अलर्ट होता. या गाण्याचे बोल होते सच बोलेंगा तो २९५ लगेगी. २९ तारीख आणि पाचवा महिना. म्हणजेच, २९ मे रोजीच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या गाण्याचे टायटल होते लास्ट राइड. या गाण्यात त्यांनी ‘थार’ वाहनाचा उल्लेख केला होता. त्याच वाहनातून जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. या गाण्याला १५ दिवसांत एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
तिहारमधून हत्येचा कट रचल्याचा संशय
लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे. त्याने कॅनडातील सहकारी गोल्डी ब्रार याच्या साथीने मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचा पंजाब पाेलिसांना संशय आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने लॉरेन्स व इतर काही जणांची चौकशीही केली.
काँग्रेसची निदर्शने
मुसेवाला यांच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्ली प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराजवळ निदर्शने केली आणि मुसेवाला यांच्या हत्येला आप जबाबदार असल्याचा आरोप केला. मुसेवाला यांची सुरक्षा कमी का करण्यात आली? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
सिद्धू यांचे वडील म्हणाले, गोळीबार होताना पाहिला
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या मुलाला वसुलीसाठी गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती. रविवारी मला जेव्हा समजले की, सिद्धू हे सुरक्षा रक्षक न घेता घरातून निघाले आहेत, तेव्हा मी सुरक्षा रक्षकांसह सिद्धू यांच्या पाठीमागे गेलो. घटनास्थळी एक कार मी पाहिली. यात चार लोक बसलेले होते. ते मुसेवाला यांच्या जीपचा पाठलाग करत होते. पुढे मुलाच्या जीपसमोर अन्य एक वाहन येऊन थांबले. या वाहनातील लोकांनी मुलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.