सिद्धू मुसेवाला यांची रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत, फॅन बनून घेतला हाेता ऑटाेग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:30 AM2022-06-07T08:30:19+5:302022-06-07T08:31:25+5:30
Sidhu Moosewala : पाेलिसांनी पंजाबमधील तरनतारनचे जगरूप सिंग रूपा व मनप्रीत मन्नू, बठिंडाचे हरकमल सिंग रानू, हरयाणातील सोनीपतचे प्रियव्रत फौजी व मनप्रीत भोलू, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा या शार्प शूटर्सची ओळख पटविली आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी ८ शार्पशूटर्सची ओळख पटविली आहे. त्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ हे दोघे पुण्याचे आहेत तर, हत्येपूर्वी रेकी करणाऱ्या केकडा याला अटक करण्यात आली आहे. त्याची अटक याप्रकरणात खूप महत्त्वाची मानली जात आहे.
पाेलिसांनी पंजाबमधील तरनतारनचे जगरूप सिंग रूपा व मनप्रीत मन्नू, बठिंडाचे हरकमल सिंग रानू, हरयाणातील सोनीपतचे प्रियव्रत फौजी व मनप्रीत भोलू, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा या शार्प शूटर्सची ओळख पटविली आहे. हे सर्व लॉरेन्स बिश्नोई गँगचे आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे सर्वजण मुसेवाला यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी कोटकपुरा महामार्गावर एकत्र आले होते.
या प्रकरणात पोलिसांना आणखी काही लोकांचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. मुसेवाला हत्याकांडात सचिन बिश्नोई हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानेच गाेळ्या झाडल्याचा दावा केला हाेता. पोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की, हत्येसाठी शस्त्र राजस्थानच्या जोधपूरमधून आणण्यात आले होते.
शार्पशूटर्सची ओळख पटल्यानंतर पंजाबसह तीन अन्य राज्यांचे पोलीस आता त्यांच्या शोधात आहेत. त्यांना शस्त्रे आणि वाहने उपलब्ध करून देणाऱ्या लोकांचाही पोलीस शोध घेत आहेत. पंजाब पोलिसांचा असा अंदाज आहे की, हे हल्लेखोर उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये लपलेले असू शकतात.
तिसरा संशयित पकडला
मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना पकडले आहे. दविंदर ऊर्फ काला याला हरयाणाच्या फतेहाबादमध्ये रविवारी सायंकाळी पकडले. हत्येत सहभागी दोन संशयित कालासोबत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी ३ जूनला फतेहाबादमधून दोन संशयितांना पकडले होते. त्यातील अटकेतील आरोपी मनप्रीत सिंग याच्यावर हल्लेखोरांना संबंधित वस्तू पुरविल्याचा आरोप आहे.
राहुल गांधी आज कुटुंबीयांची घेऊ शकतात भेट
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मंगळवारी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावात जाऊन भेट घेऊ शकतात. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे मानसा येथे जावून मुसेवाला यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करू शकतात.