सिद्धू यांचा खासदारकीचा राजीनामा!
By Admin | Published: July 19, 2016 04:55 AM2016-07-19T04:55:14+5:302016-07-19T04:55:14+5:30
‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- ‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’, अशी भूमिका घेत भाजपचे राज्यसभा सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला. सिद्धू पक्ष लगेचच सोडणार का हे स्पष्ट नाही तसेच त्यांनी भविष्यात काय करायचे हेही सांगितलेले नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून त्यांच्या प्रवासाबद्दल काही संकेत मिळतात.
सिद्धू यांना पंजाबच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका बजवायची आहे आणि भाजप त्यांना राज्यसभेत आणि टीव्ही शोजमध्ये बंदिस्त करू इच्छिचे हे स्पष्ट आहे. परंतु त्यांनी अचानकच राजीनामा देऊन पक्षाला धक्का दिला. पक्षाने त्यांचा राजीनामा रोखण्याचे केलेले सगळे अपयशी ठरले.
तथापि, नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच भाजप सोडला असून बहुधा त्या आम आदमी पार्टीत (आप) प्रवेश करतील. नवज्योत कौर यांनी भाजपचा राजीनामा फेसबुक पेजवर टाकला होता. भाजपने अकालींबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर नवज्योत कौर यांनी त्याला स्पष्टपणे विरोध केला होता. परंतु भाजपच्या नेत्यांनी अकालींबरोबर ‘तरून जाऊ किंवा बुडून’ असे ठरविले होते.
राज्यसभेत सिद्धू यांना राष्ट्रपतींकडून होणाऱ्या नियुक्तीद्वारे पाठविण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपने त्यांना राजकीय भूमिका देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. सिद्धू हे आम आदमी पार्टीसाठी निवडणुकीत प्रचार करताना दिसू शकतात व नंतर ‘आप’तर्फे त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ शकते. ‘आप’चे पंजाबमधून लोकप्रिय भगवान मान यांच्यासह चार खासदार असले तरी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाही. ‘आप’साठी सिद्धू हे योग्य ठरतात.
‘पंजाबचे लोक बदल बघू इच्छितात,’ असे सिद्धू राजीनामा देण्यापूर्वी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले होते परंतु कोणालाही ते सदस्यत्व सोडतील अशी शंकाही आली नाही. नंतर त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आपले पद हे ‘ओझे’ असल्याचे सूचित करून पक्षाबद्दलची आपली नाराजीच व्यक्त केली. ‘पंजाबकडे जाणारी प्रत्येक खिडकी बंद केल्यामुळे उद्देशच पराभूत झाला. आता केवळ ओझे राहिले असून ते आणखी पुढे वाहून न्यायचे नाही, असे मी ठरविले आहे’, असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. सिद्धू हे माजी क्रिकेटपटू व समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत.
सिद्धू यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा सादर केला. राजीनामा तत्काळ स्विकारला जावा अशी त्यांची इच्छा होती परंतु अन्सारी यांनी पुन्हा एकदा विचार करा, असे त्यांना म्हटले. परंतु सिद्धू यांची तशी इच्छा नव्हती. पक्षाचे नेते मुक्तार अब्बास नक्वी यांनी या घडामोडी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला उशीर झाला होता.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदार संघातून अरूण जेटली यांच्यासाठी सिद्धू यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यामुळेही ते नाराजच होते. खरे तर सिद्धू या मतदार संघाचे दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत होते. जेटली यांना मात्र पराभवाला तोंड द्यावे लागले होते.
सिद्धू यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे आम्ही स्वागत करतो. तुम्हाला आणखी काही विचारावेसे वाटेल म्हणून सांगतो की तो निर्णय अचानक झालेला आहे, असे आपचे नेते संजय सिंग वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
>भाजपच्या श्रेष्ठींनी मंत्रिमंडळात शीख समाजातून प्रतिनिधी म्हणून दार्जिलिंगचे खासदार एस. एस. अहलुवालिया यांना संधी दिल्याबद्दलही सिद्धू नाराज होते. साहजिकच त्यांनी काही दिवस जाऊ दिले व संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.