सिद्धू यांच्या टीव्ही शोवर हायकोर्टाची नाराजी
By admin | Published: April 8, 2017 12:15 AM2017-04-08T00:15:46+5:302017-04-08T00:15:46+5:30
कायदेशीर मुद्दा बाजूला ठेवला, तरी नैतिकता आणि शिष्टाचार या बाबींचा तरी तुम्ही टीव्ही शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करायला हवा
चंदीगड : कायदेशीर मुद्दा बाजूला ठेवला, तरी नैतिकता आणि शिष्टाचार या बाबींचा तरी तुम्ही टीव्ही शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करायला हवा, अशी टिप्पणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबतीत केली.
नवज्योत सिद्धू यांनी मंत्री झाल्यावरही कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होण्याचे ठरविल्याने त्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी तुम्ही हे शिष्टसंमत आहे का, याचा विचार करावा, असे न्यायालयाने नमूद केले. याबाबतीत कायद्यात स्पष्टता नाही, असेही न्यायालय म्हणाले. पुढील सुनावणी ११ मे रोजी होणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाही सिद्धू यांचा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी राज्याच्या अॅडव्होकेट जनरलचे मत मागविले होते. ते मत सिद्धू यांच्यासाठी पूरक होते. मात्र सिद्धू यांच्या निर्णयामुळे आॅफिस आॅफ प्रॉफिटविषयक नियमाचे उल्लंघन होत असल्याची याचिका न्यायालयात आली आहे. (वृत्तसंस्था)
>काय आहे प्रकरण?
सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीला नफा मिळणाऱ्या अन्य कोणत्याही कामात (आॅफिस आॅफ प्रॉफिट) सहभागी होता येणार नाही, हे स्पष्ट असतानाही सिद्धू यांनी तो निर्णय घेतला.
माझ्या उदरनिर्वाहाचे तेच
एक साधन आहे आणि दिवसभर मंत्री म्हणून काम केल्यानंतर, मी रात्री या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये सहभागी होईल, असे सिद्धू म्हणाले होते.