Mission Shakti: मिशन शक्तीनं कशी वाढणार भारताची शक्ती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:08 PM2019-03-27T13:08:02+5:302019-03-27T13:15:45+5:30

मिशन शक्तीच्या यशानं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

significance and importance of mission shakti for india | Mission Shakti: मिशन शक्तीनं कशी वाढणार भारताची शक्ती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mission Shakti: मिशन शक्तीनं कशी वाढणार भारताची शक्ती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

googlenewsNext

मुंबई: भारतानं अवघ्या तीन मिनिटांमध्ये अवकाशातील उपग्रह पाडत इतिहास घडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधत याबद्दलची घोषणा केली. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे. 

भविष्यातील युद्ध अवकाशात होईल, असं म्हटलं जातं. त्या दृष्टीनं भारताचं ऑपरेशन महाशक्ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. अवकाशात असलेले, देशासाठी त्रासदायक ठरणारे उपग्रह पाडण्याची क्षमता आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतानंदेखील या देशांच्या यादीत स्थान मिळवलं. यामुळे भविष्यात कोणत्याही देशाचा उपग्रह भारतासाठी त्रासदायक ठरत असेल, तर तो पाडला जाऊ शकतो. चीननं या क्षेत्रात आघाडी घेतली होती. मात्र आता हे तंत्रज्ञान भारतानंदेखील विकसित केलं आहे. सामरिकदृष्ट्या भारताचं हे यश अतिशय मोठं आहे. 

अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 
 

Web Title: significance and importance of mission shakti for india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.