नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:15 IST2025-02-03T09:12:29+5:302025-02-03T09:15:30+5:30
अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते.

नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट
-सुरेश एस डुग्गर
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात जानेवारी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्यात केवळ तिघांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट झाल्यामुळे गेल्या दोन दशकांमधील हे दुसरे वर्ष आहे, ज्याची सुरुवात शांततेत झाली. जानेवारीत दोन दहशतवादी हल्ल्यांत एक जवान व दोन दहशतवाद्यांसह तिघांचा मृत्यू झाला. २० जानेवारीला बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला. त्यानंतर ३० जानेवारीला पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील चकमकीत घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार झाले.
अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते. या वर्षी मात्र दोन दहशतवादी ठार तर एक जवान शहीद झाला. २००० दशकाच्या मध्यात दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटली होती.
जानेवारी प्राणघातक महिना
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २००१ मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये २०३ मृत्यू झाले. २००२ मध्ये दहशतवादी हल्ल्यात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अलीकडच्या इतिहासातील हा महिना सर्वांत प्राणघातक जानेवारी ठरला. जानेवारी २००० मध्ये दहशतवादी हल्ल्यात एकही हत्या वा मृत्यू झाला नव्हता.
जम्मू-काश्मीर: ड्युटीवर परतणारा सैनिक बेपत्ता
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुट्ट्या संपवून ड्युटीवर घरी परतणारा सैनिक बेपत्ता झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, रायफलमन आबिद भट शनिवारी रंगरेथ लष्करी छावणीत कर्तव्यावर परतण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील चित्तरगुल येथील आपल्या घरातून निघाले होते. भट्ट शनिवारी सकाळपर्यंत छावणीत पोहोचले नाहीत.
अतिरेकी कारवायांना चाप
गत पाच वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे हल्ल्यांतील बळींच्या संख्येत सरासरी ३४ वरून १६ पर्यंत घटली.
दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नाच्या माध्यमातून दहशतवादाला खातपाणी घालणाऱ्या संस्था नष्ट करण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा तसेच अमूर्त संपतीला लक्ष्य करण्यात आले.
दहशतवाद्यांशी निगडित ७२ कर्मचाऱ्यांना कमल ३११ या अंतर्गत बडतर्फ करण्यात आले.
अवैधरीत्या चालवल्या जाणाऱ्या दहा संघटना व गटांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा अर्थात यूएपीए या अंतर्गत बंदी घातली. यासोबत २२ लोकांना दहशतवादी घोषित करण्यात आली.
गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनेत भरती होणाऱ्या युवकांच्या संख्येतही मोठी घट झाली.