डाव्यांशी आघाडीचे काँग्रेसकडून संकेत

By Admin | Published: February 4, 2016 03:10 AM2016-02-04T03:10:10+5:302016-02-04T03:10:10+5:30

प. बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांशी युती करण्याचा सूर आळवला असताना काँग्रेस श्रेष्ठींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत

Signs from the Left Front Congress | डाव्यांशी आघाडीचे काँग्रेसकडून संकेत

डाव्यांशी आघाडीचे काँग्रेसकडून संकेत

googlenewsNext

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
प. बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांशी युती करण्याचा सूर आळवला असताना काँग्रेस श्रेष्ठींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव्यांशी राजकीय सामंजस्य निर्माण करण्याकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याशी असलेली वैयक्तिक जवळीक हेही त्यामागचे एक कारण मानले जाते. ममता बॅनर्जी यांची धरसोड वृत्ती पाहता डावे पक्ष हे विश्वसनीय भागीदार मानले जातात. बॅनर्जी यांनी डिसेंबरमध्ये सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची १०, जनपथला भेट घेतल्यानंतर तृणमूलशी युती करण्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही; मात्र बॅनर्जी यांनी काँग्रेससोबतची युती पुनरुज्जीवित करण्याचा विचार सोडून दिल्याचे स्पष्ट झाले. आपण कधीही युती तोडली नाही असे सांगत त्यांनी खापर काँग्रेसच्याच माथी फोडले होते. तृणमूलशी पुन्हा युती करण्याबाबत पक्षनेत्यांशी सल्लामसलत करणार असल्याचे सोनिया गांधी यांनी त्यांना त्यावेळी सांगितले होते, असे कळते.
माकपचा निर्णय लवकरच...
माकपच्या प्रदेश नेत्यांच्या लवकरच कोलकात्यात होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या डावपेचांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय समिती १७-१८ फेब्रुवारी रोजी औपचारिक निर्णय घेणार आहे.
तत्पूर्वी काँग्रेस-डाव्यांची आघाडी तृणमूलशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २९४ सदस्यीय प. बंगाल विधानसभेत तृणमूल-१८४, काँग्रेस- ४२, तर डाव्यांकडे ५२ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकत भाजपने खाते उघडले होते.कोणत्याही परिस्थितीत तृणमूल काँग्रेसशी युती नको अशी मागणी करीत प. बंगाल काँग्रेसने पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढविला आहे. ममता बॅनर्जी विश्वासार्ह नसून २०१२ मध्ये युती तोडताना त्यांनी जे केले त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा प्रदेश नेत्यांनी अलीकडेच राहुल गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत दिला होता. २०११ मध्ये एकत्र विधानसभा निवडणूक लढल्यानंतर वर्षभरातच तृणमूल काँग्रेसने मनमोहनसिंग यांच्या सरकारमधून बाहेर पडत काडीमोड घेतला होता. काँग्रेसनेही प. बंगालमधील सरकारमधील सहभाग काढत जशास तसे उत्तर दिले होते. अलीकडेच माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि माकपच्या अन्य नेत्यांनी तृणमूलला धूळ चारण्यासाठी काँग्रेसला युती करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

Web Title: Signs from the Left Front Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.