सैन्यदलात कपातीचे संकेत
By admin | Published: March 6, 2016 03:52 AM2016-03-06T03:52:28+5:302016-03-06T09:10:41+5:30
सैन्यदलाच्या संख्याबळात केंद्र सरकार कपात करण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भाष्यातून हे संकेत प्राप्त झाले आहेत
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
सैन्यदलाच्या संख्याबळात केंद्र सरकार कपात करण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
यांच्या भाष्यातून हे संकेत प्राप्त झाले आहेत. सैन्यदलाच्या खर्चात आधुनिकीकरणासाठी फारसे पैसे उपलब्ध नाहीत; मात्र वाढत चाललेल्या पगार आणि पेन्शनच्या रकमेवर भाष्य करताना संरक्षणमंत्री म्हणतात, सैन्यदलाची संख्या अधिक असण्यापेक्षा जे आहेत ते अधिक स्मार्ट कसे होतील, यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
संसदेत अरुण जेटलींनी २९ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी २ लाख ३0 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेजारी राष्ट्र चीनचा विकास दर यंदा ६.९
टक्के म्हणजे २५ वर्षांत त्यांच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एकीकडे चीनने लाखो कामगारांची
कपात चालवली आहे. मात्र संरक्षणाचे बजेट ७.६ टक्क्यांनी वाढवले आहे. ही रक्कम भारताच्या तरतुदीपेक्षा चौपट अधिक म्हणजे ८,५५,२५८ कोटी रुपयांची आहे.सैन्यदलातल्या ट्रक ड्रायव्हरला युद्धभूमीवरील आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी अनेक तासांचा सराव करावा लागतो. ते काम आता एका सिम्युलेटरच्या मदतीने करणे शक्य होते. साधनसामग्रीचीही त्यात बचत होऊ शकते.संरक्षण सिद्धतेसाठीची रक्कम काटकसरीने वापरायची असेल, तर सैन्यदलाच्या संख्याबळात कपात करणे हा एक उपाय होऊ शकतो, ज्याचे सूतोवाच संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. संरक्षण बजेटमधील एवढी रक्कम आधुनिकीकरणासाठी वापरण्यास अनावश्यक खर्चांना फाटा द्यावा लागेल. अशी बचत कुठे करता येईल, याच्या जागा शोधून काढण्याचे आदेश संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. उदाहरणेच द्यायची झाली तर सैन्यदलात पूर्वी जागोजागी टेलिफोन आॅपरेटर्स असायचे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यामुळे इतक्या आॅपरेटर्सची आवश्यकता नाही.