बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमार मंत्रिमंडळ बरखास्त करणार? राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:17 PM2023-12-28T12:17:59+5:302023-12-28T12:25:31+5:30
Bihar Politics: बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडमध्ये सध्या वादळ आलेले आहे. त्यातच आता सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार हे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शक्यता आहे.
बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडमध्ये सध्या वादळ आलेले आहे. त्यातच आता सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार हे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शक्यता आहे. तसेच ते बिहारमध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करू शकतात. दिल्लीमध्ये जेडीयूची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचवेळी जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. दुसरीकडे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नितीश किमार यांनी सांगितले की, दरवर्षी पक्षाची बैठक होते. ही नियमित बैठक आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत विचारले असता त्यांनी तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. तसेच जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बदलण्याच्या प्रश्नावरही त्यांनी मौन पाळले.
बिहारमधील राजकीय उलथापालथींच्या चर्चांदरम्यान, उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले की, ललन सिंह यांच्या राजीनाम्याच्या चर्चा ह्या अफवा आहेत. प्रत्येक पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करत असतो. आरजेडीने ताल कटोरा स्टेडियममध्ये कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. आम्ही जातीआधारित सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे केलं आहे, त्याला अधिक महत्त्व दिलं जात नाही आहे, असा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जेडीयूचे नेते दिल्लीला रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी, मंत्री सुनील कुमार आणि मंत्री विजेंद्र यादव पाटणा विमानतळावरून रवाना झाले आहेत.
जेडीयूमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत ललन सिंह यांची जवळीक वाढल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागावाटपाबाबतच्या घडामोडींनाही वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाआघाडीमधील जागावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार आरजेडी आणि जेडीयू प्रत्येकी १७ जागांवर निवडणूक लढवतील. तर काँग्रेसला ५ ते ६ जागा दिल्या जातील. मात्र या फॉर्म्युल्यामध्ये डाव्या पक्षांचं नाव नाही आहे. डाव्या पक्षांनी महाआघाडीसोबत मिळून बिहार विधानसभेची निवडणूक लढवली होती.