ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये दरयुद्ध भडकण्याची चिन्हे; अंबानी यांची ई-काॅमर्समध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:21 AM2020-11-12T00:21:26+5:302020-11-12T00:21:34+5:30
रिलायन्सने जिओमार्ट या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आता ई-कॉमर्स क्षेत्रात धडक दिली आहे. २०० कोटी डॉलरच्या या बाजारपेठेत त्यांचा सामना बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन डॉट कॉम आणि वॉलमार्ट आयएनसीची उपकंपनी फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस यांच्याशी होणार आहे.
रिलायन्सने जिओमार्ट या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सध्या दिवाळीचा हंगाम जोरात असून, त्याचा लाभ उठविण्याची जोरदार रणनीती रिलायन्सकडून आखण्यात आली आहे. येथेही दूरसंचार क्षेत्राप्रमाणे स्वस्त सेवेचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. मुकेश अंबानी यांच्या पोर्टलकडून भारतातील लोकप्रिय मिठाया आणि विविध मसालेदार पदार्थ यावर तब्बल ५० टक्के सूट दिली जात आहे. सॅमसंगचे काही मोबाईल हॅण्डसेट या पोर्टलवर ४० टक्के सवलतीत विकले जात आहेत.
ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करताना मुकेश अंबानी यांनी तब्बल २० अब्ज डॉलरचे भांडवल आपल्या कंपनीत ओतले आहे. केकेआर ॲण्ड कं. आणि सिल्व्हर लेक यांसारख्या संस्थांनी रिलायन्सच्या रिटेल शाखेत ६ अब्ज डॉलर गुंतविले आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहकवस्तू बाजारांपैकी एक प्रमुख बाजार आहे. येथे ऑनलाइन क्षेत्रात प्रचंड संधी असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे.