Coronavirus In India : “आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशीर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:52 PM2022-04-22T15:52:57+5:302022-04-22T16:13:46+5:30
कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत, बूस्टर डोस आवश्यक; पूनावाला यांचं वक्तव्य.
Coronavirus In India : सध्या अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. तर दुसरीकडे भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये सापडणारे कोरोनाबाधित पाहून हा धोका पूर्णपणे टळला असं म्हणता येणार नाही. केंद्रानं आता १८ वर्षांवरील सर्वांनाच बूस्टर डोस घेण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी बूस्टर डोस आणि लसीकरण मोहिमेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. “कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. यामुळे लोक सुरक्षित राहतील. कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत,” असं पूनावाला म्हणाले.
“सरकारनं लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केलं ही चांगली बाब आहे. आम्ही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून बूस्टर डोसला मंजुरी द्यावी यासाठी विनंती करत होतो, परंतु यात उशीर झाला. हे काम लवकर होणं आवश्यक होतं. मी सरकारवर टीका करत नाही, परंतु कोरोनाच्या महासाथीदरम्यान ज्या प्रकारे नियामक संस्थांनी तत्परता आणि सक्रियता दाखवली, तसं आताही व्हायला हवं,” असं पूनावाला म्हणाले. टाइम्सच्या इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं.
चार पाच बूस्टर डोसची गरज नाही
“कोरोनाच्या महासाथीमध्ये स्वदेशी लसींनी चांगली कामगिरी केली. अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण मोहीम उत्तम स्थितीत आहे. आपल्याला दुसऱ्या लोकांप्रमाणे चार पाच बूस्टर डोस घेण्याची गरज नाही. आपल्याकडे बूस्टर डोस घेण्यास आधीच विलंब झाला आहे. लस घेतल्यावर सहा महिन्यांनंतर लसीची प्रतिकारक क्षमता कमी होत जाते हे आपल्याला माहित आहे. बूस्टर डोसनं ती वाढू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आपण ती लोकांना देऊन रुग्णालयात दाखल होण्यापासून किंवा गंभीर आजारी पडण्यापासून वाचवू शकतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.