सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:44 AM2021-05-22T10:44:27+5:302021-05-22T10:47:54+5:30
Coronavirus Vaccine : WHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवा. सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत.
देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनावर (Coronavirus नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम (Vaccination Drive in India) हाती घेण्यात आली आहे. दरम्यान १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल माहिती न घेता तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवाय अनेक वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली,” अशी माहितीही त्यांनी दिली.
हील हेल्थद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ई समिटमध्ये बोलताना जाधव यांनी हे वक्तव्य केलं. “देशानं जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला हवं. त्याच्यानुसार लसीकरण केलं गेलं पाहिजे,” असं जाधव यांनी स्पष्ट केलं.
Amid an acute shortage of COVID-19 vaccines in country, executive director of Pune-based Serum Institute of India Suresh Jadhav alleges government began inoculating people from multiple age groups without taking into account available stock of vaccines and WHO guidelines
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2021
लस उपलब्ध नाही याची माहिती
“सुरूवातीला ३० कोटी लोकांचं लसीकरण होणार होतं. ज्यासाठी ६० कोटी लसीच्या डोसची आवश्यकता होती. परंतु ते लक्ष्य गाठण्यापूर्वीच सरकारनं ४५ वर्षे आणि त्यानंतर १८ वर्षाच्या वरच्या लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली. लस उपलब्ध नाही हे माहित असूनदेखील सरकारनं मंजुरी दिली,” असंही ते म्हणाले.
“ही सर्वात मोठी शिकवण होती. आम्हाला उत्पादनाची उपलब्धता लक्षात घ्यायला हवी होती. तसंच त्यादृष्टीनं वापर करायला हवा. लसीकरण आवश्यकच आहे. परंतु लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालनही केलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “लसीच्या निवडीबद्दल सांगायचं झालं तर सीडीसी आणि एनआयएच डेटानुसार जी लस उपलब्ध आहे ती घेता येऊ शकते. फक्त त्याला नियममकाद्वारे परवानगी दिली गेली असली पाहिजे. कोणती लस अधिक प्रभावी आहे किंवा नाही हे सांगणं घाईचं ठरेल,” असंही ते म्हणाले.