कौतुकास्पद! कोरोनामुळे मुलगा गमावला पण सुनेसाठी घेतला मोठा निर्णय; आनंदाने केलं कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:14 PM2022-05-05T13:14:10+5:302022-05-05T13:22:42+5:30
लेकाच्या निधनाचं दु:ख बाजुला सारून त्यांनी सुनेच्या सुखासाठी अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्या सुनेनं लग्न लावून देत तिचं कन्यादान केलं.
नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत. काहींनी मुलगा गमावला तर काहींनी मुलगी. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने कोरोनामुळे आपला मुलगा गमावला पण यानंतर त्यांनी खचून न जाता सुनेच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा, तिला नवीन आयुष्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लेकाच्या निधनाचं दु:ख बाजुला सारून त्यांनी सुनेच्या सुखासाठी अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्या सुनेचं लग्न लावून देत तिचं कन्यादान केलं. त्यांच्या या कृतींचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात राहणाऱ्या रमेशचंद सोनी यांचा मुलगा मुकेश आणि पूजा यांचं 2003 साली लग्न झालं होतं. गेल्या वर्षी मुकेशला कोरोनाची लागण झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पूजा अगदी शांत राहू लागली. तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनीच तिला नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी पूजासाठी मुलगा पाहायला सुरुवात केली.
पूजाच्या सासू-सासऱ्यांनी तिच्यासाठी मुलगा शोधून तिचं लग्न लावून दिलं. यावेळी त्यांनी पूजाचं कन्यादानही केलं. तर कन्यादानावेळी शगुन म्हणून पूजाच्या सासऱ्यांनी तिला 2.10 लाखांची एफडीची पावती दिली. जानकीनाथ मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हे लग्न पार पडलं. पूजाला एक वर्षाची मुलगीदेखील आहे. लग्नानंतर ती आपल्या आईसोबतच राहील. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली असून सासूसासऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.