सीमा-अंजू फेमस होताच अल्पवयीन मुलीने गाठलं एअरपोर्ट; मागितलं पाकिस्तानला जाण्याचं तिकीट पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:13 PM2023-07-29T16:13:22+5:302023-07-29T16:15:00+5:30
मुलगी पाकिस्तानला जाण्यासाठी जयपूर विमानतळावर आली होती. तिकीट काउंटरवर तिने मला पाकिस्तानला जायचं आहे असं सांगितलं.
एक अल्पवयीन मुलगी पाकिस्तानला जाण्यासाठी जयपूर विमानतळावर आली होती. तिकीट काउंटरवर तिने मला पाकिस्तानला जायचं आहे असं सांगितलं. याची माहिती विमानतळ कर्मचाऱ्यांनी सीआरपीएफ पोलिसांना दिली. मुलीने पोलिसांना सांगितले की ती पाकिस्तानची आहे आणि तिला तिच्या देशात परत जायचे आहे. तपास केला असता प्रकरण वेगळंच निघालं.
17 वर्षीय मुलगी पोलिसांना खोटी माहिती सांगत होती. ती पाकिस्तानची रहिवासी असून तीन वर्षांपूर्वी तिची मावशी तिला आपल्यासोबत माधोपूरला घेऊन आली होती, असं मुलीने सांगितलं होतं. पण मावशीशी भांडण झाल्यावर तिला परत पाकिस्तानात जायचं होतं. पोलिसांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा त्यांनी पुन्हा चौकशी केली.
मुलीने त्यानंतर सांगितले की, तिचा प्रियकर पाकिस्तानमध्ये राहतो. ती त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात होती. त्याच माणसाने तिला तिकीट कसे काढायचे आणि एअरपोर्टच्या काउंटरवर काय बोलायचे हे सांगितले होते. मात्र तिच्या बोलण्यावरून पोलिसांनाही संशय आल्याने त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला.
ही मुलगी सीकर जिल्ह्यातील रतनपुरा गावची रहिवासी असल्याची माहिती मिळाली. तत्काळ तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानंतर मुलीने जे सांगितले ते ऐकून पोलीसही हैराण झाले. तिने सांगितले की सीमा आणि अंजू प्रकरणामुळे ती खूप प्रभावित झाली आहे. सीमा आणि अंजूबद्दल साऱ्या देशाला माहिती आहे. संपूर्ण देश त्याला ओळखतो. त्यामुळेच हे सर्व नाटक करून खोटी लोकप्रियता मिळवण्यासाठी केले. जेणेकरून तीही प्रसिद्ध होईल. सध्या पोलीस या अल्पवयीन मुलीची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.